ऑनलाईन टीम / पिंपरी :
अवघ्या सव्वा दोन वर्षांवर आलेल्या महापालिका निवडणुका डोळय़ासमोर ठेवून शहरातील कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बळ दिले जाण्याच्या शक्यतेने राज्य सरकारच्या महामंडळांसाठी स्थानिक नेतेमंडळींमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
बहुतांश नेत्यांनी नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न चालविले असून अजित पवार शहरातील कोणा-कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताबदल झाल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून सत्तेबाहेर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेच्या केंद्रस्थानी आला. राज्यात महाविकास आघाडीतील महामंडळाच्या वाटपानंतर सुमारे 25 महामंडळे राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आली आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱया महामंडळावर स्थानिक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावून त्यांना ताकद देण्यात येणार आहे. त्यामुळे सत्तेबाहेर असलेल्या काही स्थानिक नेत्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.









