धुवाँधार कोसळणाऱ्या पावसाने वेण्णा तलाव तुडुंब भरला, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सांडव्यावरून वाहू लागले पाणी
आजअखेर महाबळेश्वरमध्ये १००८.० मिमी (४० इंच) पावसाची नोंद
प्रतिनिधी / महाबळेश्वर :
महाबळेश्वरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या धुवाँधार पावसाने वेण्णालेक तलाव तुडुंब भरला आहे रविवारी दुपारी तीनच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले असून आजअखेर महाबळेश्वरमध्ये १००८.० मिमी (४० इंच) पावसाची नोंद झाली आहे.
महाबळेश्वर शहर व परिसरात गेली काही दिवस पावसाची संततधार सुरु असून जून महिन्याच्या प्रारंभीपासूनच कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे बरसणाऱ्या या पावसाने तमाम महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारे, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण वेण्णातलाव तुडुंब भरला असून रविवारी दुपारी तीनच्या सुमारास वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले याच वेण्णालेकमधून महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने समाधान व्यक्त होत आहे. वेण्णालेक परिसरात पर्यटकांची रेलचेल आज अनुभवायास मिळाली सर्वत्र दाट धुके सोबतच पावसाची रिमझिम बरसात अश्या वातावरणाचा पर्यटनास आलेले पर्यटक आनंद घेताना दिसून येत आहेत.