गाडय़ांची कसून चौकशी ; गाडय़ा परत पाठविली
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वरमध्ये पावसाळी सहलीसाठी आलेल्या सुमारे 100 हून अधिक पर्यटकांच्या गाडय़ा नगरपालिका व वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱयांनी वेण्णा तलाव तपासणी नाक्यावरून परत पाठविल्या. सर्व नाक्यांवर बाहेरून येणाऱया पर्यटकांची कसून चौकशी केली जात आहे. सातारा जिह्यातील महाबळेश्वर शहर हे कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत असताना निर्बंध शिथील न झाल्याने पर्यटकांत नाराजी असल्याचे चित्र आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेतून राज्य सावरत असताना राज्यात सर्व ठिकाणचे निर्बंध काही अंशी शिथिल केले गेले आहेत. सातारा जिल्हा ही त्यास अपवाद नाही. मात्र अद्यापही हा जिल्हा कोरोनाबाबत चौथ्या स्थानावर असल्यामुळे या जिह्यात अद्यापही शिथीलतेबाबत कडक धोरण आहे. जिह्यातील पर्यटस्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत. असे असताना आंतर्गत जिल्हाबंदी शिथिल झाल्याने महाबळेश्वर, पांचगणी सारख्या पर्यटनस्थळी पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या पावसाळी हंगाम सुरू असल्याने निसर्गाची विलोभनीय दृश्य व छोटे छोटे धबधबे सुरू झाले असून धुके आणि पावसामुळे पर्यटकांना भुरळ पाडत आहे. मात्र येथील शहरातील हॉटेल, लॉज, दुकाने यासाठीचे निर्बंध कमी न झाल्याने ती सर्व गेले काही महिने बंद आहेत. त्यामुळे पर्यटकांत नाराजी आहे. असे असले तरी या शहरव्यातिरिक्त परिसरातील खासगी बंगले, लॉजेस नियम धाब्यावर बसून सुरू आहेत. दरम्यान सातारा जिल्हा जरी कोरोनाबाबत चौथ्या स्थानावर असला तरी महाबळेश्वर शहर व तालुक्याचा विचार केल्यास हा तालुका जवळ जवळ कोरोना मुक्तीच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही पर्यटन स्थळे पर्यटकांना काही अंशी खुली करावीत, आम्ही शासनाचे सर्व नियम व अटींचे पालन करू, अशी मागणी नुकतीच महाबळेश्वर, पंचागणी येथील हॉटेल, लॉज मालक विविध व्यावसायिक, व्यापारी, दुकानदारांनी निवेदनाने जिल्हाधकाऱयांकडे केली आहे. मात्र अद्याप परवानगी न मिळाल्याने आज पालिका जकात ना तपासणी अधिकारी, कर्मचाऱयांनी महाबळेश्वरला आलेल्या सुमारे शंभरहून अधिक गाडय़ा प्रसिद्ध वेण्णा तलाव तपासणी नाक्यावरून परत पाठविल्यामुळे पर्यटकांच्यात नाराजी दिसून येत होती.
तर अनेक हौशी नाराज पर्यटकांना रस्त्याच्या कडेला बसून पार्सल सेवेतून मिळालेले खाद्य पदार्थ खाऊन पुन्हा परतावे लागले. काहीजण विविध युक्त्या करून शहरात आल्याचे दिसून आले. मात्र पालिका तपासणी पथकांनी त्याचा शोध घेवून त्यांनाही परत पाठविले. सध्या येथील सर्वच नाक्यांवर बाहेरून येणाऱयांची कसून चौकशी केली जात आहेत. यामुळे पर्यटकांच्या नाराजीचा सुर आहे. तसेच गेले कित्येक महिने पर्यटस्थळ व पर्यटनावर अवलंबून असलेले सर्वच व्यवसाय बंद असल्याने सर्वांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. पर्यटनावर अवलंबून असणारे व्यवसाय सुरू करण्यास तसेच पर्यटकांना येण्यास अधिकृतपणे परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. जिल्हाधिकाऱयांनी यांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा.








