अस्मिता मोहिते / सातारा
कृषी विभागातर्फे नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून महाबळेश्वर भागात केशर लागवड करण्यात आली होती. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता या भागात आणखीन काही शेतकऱ्यांकडून ही केशर लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे आता महाबळेश्वरची ओळख आता स्ट्रॉबेरी उत्पादनाबरोबर केशर उत्पादनाचा भाग म्हणून होतोय की काय असे वाटत आहे.
भारतात केवळ काश्मिरमध्ये केशरचे उत्पादन घेतले जाते. ते ही श्रीनगर येथील पंपुर आणि किस्टवाड या गावांमध्येचे याचे मुख्यत: उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी जवळपास ४५० केशरचे कंद (मुळ) हे मागविण्यात आले होते. त्यानुसार महाबळेश्वर मधील तीन शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात याची लागवड आपल्या शेतात केली होती. त्यापैकी तीन कंद हे चांगले फुटले असुन त्याला केशर आले आहेत. आता ते वाळविण्याची प्रक्रिया सुरू असुन उर्वरित कंद देखिल लवकरच केशर फुटण्याच्या मार्गावर आहेत.
या प्रयोगावरून हे उत्पादन महाबळेश्वरसारख्या आपल्या भागात देखिल घेऊ शकते हे सिध्द झाले असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने आता आणखीन १० शेतकऱ्यांतर्फे या केशरच्या कंदाची लागवड करण्यात येणार आहे. एखादा वेगळा व नाविन्यपुर्ण प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने ही केशर लागवड करण्यात आली आहे.
भारतीय केशरला आयुर्वेदात खुप महत्व आहे. त्याची मागणी ही १०० टन इतकी आहे. आपल्या देशात ६० टन इतके उत्पादन मिळते. उर्वरित ८० टक्के केशर हे स्पेनमधुन आयात केले जाते. जवळपास जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान याची लागवड केली जाते. डिसेंबर महिन्याच्या दरम्यान याला फुलं येण्याच्या प्रक्रियेस सुरूवात होते. जवळपास दीड लाख फुलांपासून १ किलो केशर मिळते. व याच एक किलो केशरची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये इतकी आहे.
खर्च कमी
इतर पिके घेताना आपल्याला फवारणीचा व पाण्याकरीता खर्च करावा लागतो. पण ही कंद जर शेतात पेरली की त्याला पाणी अत्यंत कमी लागते. तसेच एकदा लागवड केली की जवळपास १२ ते १४ वर्षे या कंदांमधुन फुलं फुटुन आपल्याला उत्पादन मिळत जाते. ही फुले १२ डीग्री इतक्या तापमानात असावी लागतात. तसेच कंद लागवडी दरम्यान एका ते दुसऱया कंदामध्ये जवळपास १० ते १५ सेंटीमीटर इतके अंतर असावे लागते. कारण एका कंदाला आणखीन कंद फुटतात व त्याला फुलं येतात. जवळपास अडीच हेक्टर भागात ३ ते ५ किलो इतके केशर मिळु शकते.
घ्यावयाची काळजी
उन्हाळ्यात काश्मिरपेक्षा आपल्या भागात तापमान अधिक असते. त्यामुळे या दरम्यान शेड घालावे लागणार आहे. तसेच पाणी आवश्यक्यतेनुसार वापरावे. याकरीता पावसाळ्यात निचरा होणारी जमीन. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने प्लास्टीक कव्हर घालावे लागणार आहेत.
भारतीय केशरला सर्वाधिक पसंती अन् दरही
संपूर्ण जगामध्ये भारतासह अमेरिका, स्पेन, इरान, अफगान या भागात केशरचे उत्पादन घेतले जाते. पण यापैकी आपल्या देशातील केशर हे अती उच्च दर्जाचे केशर मानले जाते व त्याला मागणी ही अधिक आहे. तसेच परदेशीय केशरचा दर हा एका किलो मागे ४० हजारापासुन १ लाख ६० हजार इतका आहे. त्यामानाने आपल्या देशातील केशरला दरही चांगला मिळतो.
केशर उत्पादनाकरिता शेतकऱ्यांनी पुढे यावे
समुद्रसपाटीपासुन दीड हजार उंचीवरील क्षेत्रात केशरचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून कृषी विभागातर्फे महाबळेश्वर परिसरात हा प्रयोग राबविला व हा प्रयोग यशस्वी देखिल ठरला आहे. त्यानुसार आता आपल्या भागात ही केशरचे उत्पादन घेण्यात येऊ शकते हे निश्चित झाले आहे. श्रीनगरमधुन ही बोंड मागविण्यात आली होती. एका बोंड मागे ५० रुपये इतका खर्च आला आहे. त्यामुळे आता अनेक शेतकरी या केशर उत्पादना करीता पुढे आले आहेत.
दिपक बोर्डे, कृषी सहाय्यक अधिकारी, महाबळेश्वर