सीईएन विभागाची कारवाई : तरुणाला अटक, एक जण फरारी, तपास सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
महाबळेश्वरनगर (हिंडलगा-गणेश मंदिराजवळ) येथे एका भाडोत्री घरात साठविण्यात आलेली 1 लाख 15 हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. सोमवारी सीईएन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून दुसरा फरारी आहे.
अनिल नारायण धमुणे (वय 28, रा. चव्हाट गल्ली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. महाबळेश्वरनगर येथील श्रीनिवास पाटील यांच्या भाडोत्री घरात 155 लिटर गोवा बनावटीची दारू व 18 बिअरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हा साठा विक्रीसाठी दिलेला राजेश केशव नायक (रा. कुमारस्वामी लेआऊट) हा फरारी झाला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
या घरातून रम, व्हिस्की, ओडका, बिअरसाठा जप्त करण्यात आला आहे. सर्व साठा गोवा येथील असून भाडोत्री घरात साठा ठेवून त्याची विक्री केली जात होती. सध्या फरारी असणाऱया राजेश नायक याला यापूर्वीही अनेकवेळा अटक झाली होती.









