प्रतिनिधी / कोल्हापूर
अखेरच्या क्षणापर्यंत अंतर्गत घडामोडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी झालेल्या चुरशीत काँग्रेस आघाडीमधून निलोफर आजरेकर यांनी बाजी मारली. महापौरपदासाठी त्यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, दरम्यान भाजप-ताराराणी आघाडीतर्फे अर्चना पागर यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. काँग्रेस आघाडीच्या संख्याबळाचा विचार करता 10 रोजी होणाऱया निवडणूकीमध्ये आजरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे मानले जात आहे.
महापालिकेच्या राजकारणामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे वर्चस्व आहे. आठ महिन्यानंतर महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. शेवटचे काही महिने बाकी असल्याने काँग्रेसमधील महापौरपदासाठी अनेक जण दावेदार होते. इच्छुकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडेच फिल्डिंग लावली होती. आठ महिन्यांच्या कालावधीत दोघांना संधी मिळावी, असा आग्रह इच्छूकांनी धरला होता. त्यामुळेच कोल्हापूर उत्तर किंवा दक्षिण मतदारसंघातील एका इच्छुकाला महापौरपदाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निलोफर आजरेकर यांच्यासह जयश्री चव्हाण व उमा बनछोडे यांच्यासह कोल्हापूर दक्षिणमधून इंदुमती माने व दीपा मगदूम इच्छुक होत्या. अखेर आजरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. गुरुवार सायंकाळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला निलोफर आजरेकर यांना महापौरपदी संधी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे प्रमुख आणि इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे गेले.पुढील महापौरपदावर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधील इच्छूकाची वर्णी लागणार आहे.
भाजप –ताराराणी निवडणूक लढविणारच
महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ द्यायची नाही. काहीही झाले तरी निवडणुक लढवायचीच या निर्धाराने भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीने सर्किट हाऊस प्रभागाती नगरसेविका अर्चना पागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जयश्री चव्हाण, बनछोडे नाराज
नाथा गोळे तालीम परिसरातील नगरसेविका जयश्री चव्हाण या महापौरपदासाठी इच्छुक होत्या. मात्र आजरेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेल्यावर चव्हाण नाराज होऊन महापालिकेतून घरी निघून गेल्या. त्यामुळे त्यांच्या नाराजीची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली होती. तसेच माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, विद्यमान नगरसेवक उमा बनसोडे व त्यांचे पती शिवानंद बनसोडे हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे महापौरपदी वर्णी लागेल अशी बनछोडे कुटुंबीयांची अपेक्षा होती. महापौरपदासाठी विचार न झाल्याने बनछोडे नाराज असल्याचेही चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये होती.