बळ्ळारी नाल्याची केली पाहणी- पाईप स्वच्छ करण्याच्या आमदार अनिल बेनके यांच्या सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय महामार्गाजवळ बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याचे पाणी अडून राहत आहे. या रस्त्याला असलेल्या पाईप स्वच्छ कराव्यात, अशी मागणी वारंवार बेळगाव जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचा फटका आता या पावसामुळे बसला असून महापालिकेला खडबडून जाग आली. आमदार अनिल बेनके यांच्यासह महापालिका अधिकाऱयांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी शेतकऱयांनी अनेक तक्रारी त्यांच्याकडे मांडल्या.
या पावसामुळे शेकडो एकर जमिनीतील पिके वाया गेली आहेत. त्याची पाहणी आमदारांनी केली. या सर्वांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. याबाबत सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करून ही नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन दिले आहे. मुसळधार पावसामुळे बांध फुटून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. भात पीक कुजून जाणार आहे. काही ठिकाणी वाहूनही गेले आहे. त्यामुळे शेतकऱयांसमोर दुबार पेरणीचे संकट आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
जोपर्यंत शहरातील नाले, परिसरातील नाले स्वच्छ होत नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती राहणार आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे. हे केवळ मोठय़ा नाल्यांतून पाणी निचरा होत नसल्यामुळे, तेव्हा नाले प्रथम स्वच्छ झाले पाहिजेत. तेव्हाच बेळगाव पुरातून मुक्त होईल, असे यावेळी सांगण्यात आले. निवडणुकांमुळे आचारसंहिता लागली. त्यामुळे ही कामे अर्धवट राहिली, असे सांगण्यात आले. पण दरवषीच ही परिस्थिती होत आहे. तेव्हा याचा कोठे तरी गांभीर्याने विचार होणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, सुनील जाधव, सुनील खन्नूकर यांच्यासह इतर शेतकऱयांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आता हा फटका बसला आहे. वास्तविक नारायण सावंतसह इतर सर्व कार्यकर्त्यांनी वारंवार पाईप स्वच्छ करण्याची मागणी केली होती. याचबरोबर नाल्यातील अतिक्रमण हटवा, अशीदेखील मागणी केली. मात्र, कोणीच गांभीर्य घेतले नाही. पण आता पावसाळा येताच साऱयांना जाग आल्याच्या प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. शनिवारी पाहणी करताना महापालिकेचे आयुक्त जगदीश के. एच., मंजुश्री सचिन कांबळे, तालुका अध्यक्ष सुनील जाधव, श्रीधर पद्मण्णवर, अरुण पुजारी, सुनील खन्नुकर, उत्तम नाकाडी, आप्पा मंडोळकर, महेश बडमंजी, कृष्णा पिंगट, राहुल मोरे, पुंडलिक मोरे, आप्पाराव भोसले, सुनील अनगोळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









