भोगावती खरेदीविक्री संघाचे मोठे आर्थिक नुकसान
प्रतिनिधी / चुये
भोगावती, कुंभी, पंचगंगा, दुधगंगा या नदींना अचानक आलेल्या महापुरामुळे विकास संस्था, शेती सेवा केंद्र व खरेदी विक्री संघाच्या खत गोडाउनमध्ये पाणी शिरल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा रासायनिक व इतर खते मातीमोल झाली आहेत. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रत्येक गोडाउनमध्ये झालेल्या नुकसानीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये सर्वाधिक आर्थिक नुकसान करवीर तालुक्यातील हळदी येथील भोगावती खरेदी विक्री संघ रोहित ट्रेडर्स यांना बसलेला आहे. या संघाची पन्नास लाखांहून अधिक रकमेची रासायनिक खते पाण्यात भिजल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
२०१९ प्रमाणे यंदाच्या खरिप हंगामात महापुराने थैमान घातल्यामुळे व अचानक नदीची पाणी पातळी मतापुराचा फटका बसलेला आहे. तालुक्यातील विकाससेवा संस्था, शेती सेवा केंद्र व खरेदी विक्री संघांच्या खत साठवणूक गोडाऊनला महापुराच्या मोठा आर्थिक फटका सोसावा लागलेला आहे. अचानक झालेली ढगफुटी अतिवृष्टी त्यामुळे अवघ्यातीन दिवसात नद्यांना मोठा महापूर आला त्यामुळे तालुक्यातील काही गोडाऊनमध्ये पाणी शिरले तर काही शेती सेवा केंद्रांच्या गोडाऊनला मोठ्या प्रमाणात गळती लागली आणि त्यामध्ये असणारा रासायनिक खत माल भिजला गेला त्यामुळे या व्यवसायाचे लाखोरूपयाचे नुकसान झाले आहे.
भोगावती संघाचे मोठे नुकसान
हळदी ता. करवीर येथे भोगावती खत खरेदी-विक्री संघाचे व रोहीत ट्रेडर्स चे खत साठवणूक गोडाऊन आहे खरीप हंगामासाठी व आडसाली ऊस लागणीसाठी लागणारी रासायनिकव इतर खते या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक होती .अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाने अचानक पाण्याची पातळी वाढल्याने भोगावती ला महापूर आला संघाच्या गोडाऊन मध्ये महापुराचे पाणी शिरल्या मुळे गोडाऊन मधील खते बाहेर काढण्याची संधी सुद्धा संघाला मिळाली नाही त्यामुळे या गोडाऊनमध्ये असणारी युरिया व इतर दाणेदार खतांची पोती पाण्यात गेली सर्वच खतमाल भिजल्यामुळे संघाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे .
शासनाकडून आर्थिक मदतीची गरज
शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडित असणारा हा खत विक्री व्यवसाय व त्यावर ती कर्ज काढून उभा केलेली शेती सेवा केंद्र, खरेदी विक्री संघ. महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीबरोबरच शेतीच्या उत्पनवाढी साठी सलग्न असणारे खतखरेदी विक्री व्यवसाय महापुराच्या विळख्यात सापडले. महापुराचा मोठा आर्थिक फटका या उद्योजकांना बसला आहे . नोकरी मिळत नाही म्हणून शेतीसेवा केंद्राच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या या तरुण उद्योजकांचे महापुरात खत माल भिजल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विक्रीचा मालच भिजल्याने या व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्याची गंभीर दखल घेऊन या व्यवसायिकांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून भरीव आर्थिक सहकार्य करून खत खरेदी विक्री व्यवसायाला आधार देण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा अशी मागणी खत विक्री उद्योजकांच्या मधून केली जात आहे.