युवा समितीच्यावतीने आज पोलीस आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव परिसरात नेहमीच काही मोजके कन्नड संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहेत. यामुळे बेळगावची शांतता भंग पावत आहे. सोमवारी अचानकपणे महापालिकेसमोर लाल-पिवळय़ा रंगाचा ध्वज लावून काही कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. त्यामुळे बेळगाववासियांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी मुठभर कार्यकर्ते महापालिकेच्या समोर आले. अचानकपणे आणलेला लाल-पिवळय़ा रंगाचा ध्वज रोवला. पोलिसांनी त्यांना काहीसा अडविण्याचा प्रकार केला. मात्र, त्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे तिरंगापेक्षाही लाल-पिवळय़ा रंगाचा ध्वज मोठा काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आज पोलीस आयुक्तांना निवेदन
महानगरपालिकेवर काही जणांनी लाल-पिवळा फडकवत बेळगावचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला आहे. याविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
लाल-पिवळा झेंडा अनधिकृत आहे. तसेच तिरंग्यासमोर हा झेंडा फडकविला गेला आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा हा अवमानच होतो. हा अनधिकृत झेंडा हटवावा व बेळगावचे वातावरण गढूळ करणाऱया समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.









