सांगली / प्रतिनिधी
कोरोना रोखण्यासाठी महापालिका यंत्रणा युद्धपातळीवर लढत आहे. परंतु उत्पन्नाचे स्त्रोत बंद असल्याने आर्थिक कोंडी झाली आहे. यासाठी पंतप्रधान निधीतून महापालिकेला कोरोना उपचारासाठी २५ कोटींचा निधी द्या अशी मागणी महापालिका पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी महापौर गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार आदी उपस्थित होते. प्रसंगी फडणवीस यांनी भरीव मदतीचे आश्वासन दिले.
महापालिकेच्या वतीने येथील आदीसागर मंगल कार्यालयात उभा करण्यात आलेल्या कोविड सेंटरला फडणवीस यांनी भेट दिली. अल्प वेळात आणि अडचणीची परिस्थिती असतानाही महापालिकेने कोविड सेंटर उभा केल्याचे त्यांनी कौतुक केले. या कोविड सेंटरमुळे रुग्णांना दिलासा मिळाला असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान व्हिडीओ कॉलिंग द्वारे त्यांनी रुग्णांशी संपर्क साधला. त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.