क्षमतेहून अधिक अर्जांची विक्री
कोल्हापूर प्रतिनिधी
पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत महापालिकेच्या शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. महापालिकेच्या शाळेत सेमी इंग्रजी अन डिजीटल शिक्षणही उत्तम प्रकारे दिले जात आहे. एवढेच नव्हे तर कोरोनामध्ये ‘माझा टीव्ही, माझी शाळा’ उपक्रम राबवून स्थानिक टीव्ही चॅनलच्या माध्यातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. हा उपक्रम राज्यभर गाजला असून महापिलेकेला विशेष पुरस्काराने सन्मानित केले. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर होणाऱ्या प्रवेशात महापालिकेच्या शाळांना डिमांड आले आहे. महापालिका शाळांमधील प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली आहे.
नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेशाला मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरूवात केली जाते. गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांच्या प्रवेशात वाढ होत आहे. टेंबलाईवाडी विद्यालय, जरगनगर शाळा, वि. स. खांडेकर शाळा, यासह अन्य शाळांमधील पटसंख्येपेक्षा जास्त अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे यंदाही महापालिकेच्या शाळांना डीमांड आले आहे. आपल्या पाल्याला महापालिकेच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून अर्ज खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी आहे.
महापालिकेच्या शाळा पटसंख्या अन अर्ज विक्री
शाळा अर्जांची विक्री
टेंबलाईवाडी विद्यालय 110
जरगनगर विद्यालय 330
नेहरूनगर विद्यालय 110
प्रिन्स शिवाजी जाधववाडी 70
शाबाज खान अमीन खान उर्दू सरनाईक वसाहत 90
महात्मा फुले विद्यालय 115
जोतिर्लिंग विद्यालय 117
रावबा विचारे विद्यालय 61
छत्रपती संभाजी विद्यालय 42
यशवंतराव चव्हाण विद्यालय 60
‘माझा टीव्ही, माझी शाळा’ यशस्वी उपक्रम
कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असल्या तरी कोल्हापुरातील महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने ‘माझी टीव्ही, माझी शाळा’ हा उपक्रम पहिली ते सहावीच्या वर्गासाठी राबवला. शिक्षकांनी केलेल्या अध्यापनाचे प्रक्षेपण स्थानिक केबलवरून केले. या उपक्रमाचा लाभ जिल्हय़ातील जवळपास 5 लाख विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे कोरोनात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यात शिक्षण विभाग यशस्वी झाला. या उपक्रमाला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी घेतलेल्या स्पर्धेतही विशेष पुरस्काराने सन्मानित केले.
डिजीटल शाळा अन विविध उपक्रमामुळे ज्यादा प्रवेश
महापालिकेच्या शाळा डिजीटल व्हाव्या यासाठी शासनासह लोकसहभागातून मदत मिळत आहे. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये विविध उपक्रमही राबवले जात आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहेत.
डी. सी. कुंभार (प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण समिती)









