प्रभाग रचना जाहीर होताच सोशलमिडीयावरून प्रचार
कोल्हापूर / प्रतिनिधी
महापालिका निवडणूकीसाठी 31 प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाली. 12 हजार ते 19 हजारांचा एक प्रभाग झाला आहे. काही जुने प्रभाग फुटले आहेत. तर काही परिसर नवीन जोडला गेला आहे. यामुळे काही विद्यमान नगरसेवकांसह अनेक मातब्बरांचा धक्का बसला आहे. तर काहींच्या पथ्यावर पडली आहे. यामुळे कही खुशी कही गम अशी स्थित आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहाची 15 नोव्हेंबर 2020 मध्ये मुदत संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक दोन वेळा लांबणीवर पडली होती. राज्य निवडणूक आयोगाने ओबींसी आरक्षण वगळून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. यानुसार कोल्हापूर महापालिकेची थांबलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. मनपाने मंगळवारी 31 वॉर्डची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. मनपाच्या वेबसाईटसह पाच ठिकाणी नकाशासह ही पाहण्यासाठी उपलब्ध केली आहे. एकाच ठिकाणी गर्दी होवू नये म्हणून क्युआर कोडसहीत वेबसाईटची लिंक व्हायरल केली होती. 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी एकही हरकत दाखल झाली नव्हती.
नाव नसणारे प्रभाग
महापालिकेच्या निवडणूकीमध्ये प्रभागांना नावे दिली जातात. परिसरातील प्रसिद्ध ठिकाणाचे नावे असते. यावेळी प्रभाग क्रमांकनुसार प्रभाग रचना जाहीर केली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 31 यांचा समावेश आहे. सध्या एका प्रभागातील तीन पोट प्रभाग मात्र, निश्चित केलेले नाहीत.
मातब्बरांना धक्का
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे जुन्या प्रभाग रचनेच्या तुलनेत प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. वाढीव क्षेत्र आणि काही जुने प्रभाग नवीन दोन प्रभागात विभागल्याने अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे. यामध्ये शहरातील सर्वाधिक प्रभाग शहरातील आहेत.
राजकिय पक्षांची चलती
सध्याची निवडणूक पॅनेल पद्धतीने होणार आहे. प्रभाग क्रमांक 31 वगळून इतर प्रभागात एका मतदाराला तीन मते देण्याचा अधिकारी आहे. यामुळे उमेदवाराला संपूर्ण प्रभागातून मते मिळावावी लागणार आहे. 19 हजारांचा प्रभाग झाल्याने अपक्षांना निवडणूक अवघड बनली आहे. तर पक्षाच्या उमेदवारांना एकमेंकाची मदत होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्याही कमी होणार आहे. यामुळे काहींचा पत्ता कट झाला असून राजकिय पक्षांची चलती असणार आहे. पक्षाची उमेदवारी मिळणाऱयांचे पारडे जड राहणार असून पक्षाची उमेदवारीसाठी चढाओढ होणार आहे.
सोशलमिडीयावरून प्रचार
प्रभाग रचना जाहीर होताच काही इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी सोशलमिडीयावरून प्रचारालाही सुरवात केली. समर्थकांनी नेत्यांचे स्टेटसही ठेवले आहेत. तर काहींनी प्रभाग रचनेचा नकाशा ठेवला आहे.