प्रतिनिधी / कोल्हापूर
सक्षम कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची शक्यता असल्याने महापालिकेत महाविकास आघाडी होवू शकत नाही तसे आघाडी केली तर चांगले कार्यर्ते विरोधकांच्या हाताला लागतील ते टाळण्यासाठी काही ठिकाणी मैत्रीपुर्ण तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार आहोत. मात्र महापालिका एकहाती राष्ट्रवादीकडे राहील असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शासकिय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. बिनविरोध ग्रामपंचायतींचा प्रयत्न लोकशाहीला मारक असल्याचेही त्यानी एका प्रश्नावर सांगितले.
ते म्हणाले, पाच वर्षात महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी आघाडी कार्यरत होती. पण यातील प्रत्येक पक्षाला आपलेच अधिक नगरसेवक निवडून यावेत असे वाटते. म्हणून हे तिन्ही पक्ष यावेळी कांही ठिकाणी स्वतंत्र लढतील. तर राष्ट्रवादीचाच झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी कार्यकर्ते राबतील, असा विश्वास आहे. ते म्हणाले, यापूर्वीच्या महापालिकेच्या तीन निवडणुका निकालानंतर आघाडी केली आहे. आताही असेच होईल. पक्ष स्वतंत्र असल्याने प्रत्येकास आपलेच नगरसेवक अधिक यावेत, असे वाटते. इच्छुकांचीही संख्या अधिक आहे. यावेळी शहरात काँग्रेसचे तीन आमदार आहेत. म्हणून पालकमंत्री सतेज पाटील यांना आपली ताकद वाढल्याचे वाटते. म्हणून स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत
सध्या ग्रामपंचायत निवडणुका सुरू आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया ताकदीने या निवडणूकीत सहभाग घेत आहे. लोकशाहीत निवडणुकीने निवडून आल्यास ताकद कळते. यामुळे ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोधपेक्षा निवडणूका झाल्या पाहिजे, असे मला वाटते. बिनविरोध आणि सरपंचपदासाठी कोटीच्या बोली लागत आहेत. हे चुकीचे आहे. याची चौकशी करण्याची मागणीही आपण राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.