विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्यामुळे राज्यभरात खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळेच सोमवारी बेळगाव महानगरपालिकेत प्रवेश देताना पुन्हा एकदा मास्कची सक्ती करण्यात आली. मास्क असणाऱयांनाच कार्यालयात प्रवेश देण्यात येत होता. तसेच विनामास्क फिरणाऱयांवर महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.
मध्यंतरी कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर मास्कची सक्ती काहीशी कमी करण्यात आली होती. यामुळे मास्कविना फिरणाऱयांची संख्या वाढली होती. परंतु राज्य सरकारने पुन्हा एकदा धोक्मयाचा इशारा दिल्यामुळे सर्वत्रच मास्कची सक्ती करण्यात येत आहे. बेळगाव महानगरपालिकेत दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येत असतात. कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी आयुक्तांच्या सूचनेनुसार सोमवारपासून मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
मनपाच्या मुख्य गेटवरच सुरक्षा रक्षकांकडून मास्क घालणाऱयांनाच प्रवेश दिला जात होता. जे नागरिक विनामास्क कार्यालयात येत होते, अशांना प्रवेश नाकारण्यात आला. तसेच त्यांच्याकडून 250 रुपये दंड वसूल केला जात होता. यामुळे अनेक नागरिकांना माघारी फिरावे लागले. जवळच्या दुकानातून मास्क खरेदी करून नागरिक पुन्हा महानगरपालिकेत दाखल होत होते.