बाधिताची संख्या वाढल्याने पंधरा दिवसांपासून सर्व कामे बंद : 25 हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनमुळे शहरातील व्यवहार पूर्णपणे थांबले असून महापालिकेचे दैनंदिन कारभार देखील ठप्प झाले आहेत. जन्म-मृत्यू दाखले, इमारत बांधकाम परवानगी, विकासकामे आणि व्यवसाय परवाने अशा विविध कामासाठी नागरिक महापालिकेत धाव घेत असतात. कोरोना बाधिताची संख्या वाढल्याने पंधरा दिवसांपासून सर्व कामे बंद ठेवली आहेत. तसेच मनपा कार्यालयातील 25 हून अधिक कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने कार्यालय ओस पडले असून कामकाज ठप्प झाले आहे.
कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने वाढत आहे. याकरिता जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रंदिवस धावपळ करीत आहेत. एरवी नागरिकांची गर्दी राहणारे महापालिका कार्यालय ओस पडले आहे. जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक महापालिका कार्यालयात रांगा लावून थांबत असतात. पण जन्म-मृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने हा विभाग बंद ठेवण्यात आला आहे.
विशेषतः मार्च आणि एप्रिल महिन्यात घरपट्टी वसुलीकरिता विशेष मोहीम राबविण्यात येते. फेब्रुवारी महिन्यात या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता. घरपट्टी आणि गाळय़ाचे भाडे वसूल करण्यासाठी कारवाईची मोहीम राबविण्यात येत होती. लोकसभा पोटनिवडणूक आणि कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने कार्यालयातील सर्वकाम ठप्प झाले आहे. तसेच क्लोजडाऊनमुळे मालमत्ता कर वसुली मोहीम थांबली आहे. यामुळे महसूल विभागाला 45 कोटी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्तीसाठी वसुली मोहीम राबविण्यात येणार होती. पण मनपाच्या सर्व मोहिमांना कोरोनाचे ग्रहण लागले आहे. तसेच एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱयांना पाच टक्के कर सवलत देण्यात येते. पण सध्या घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील बनले आहे. मुख्यतः पंधरा दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांची अर्थिक घडी कोलमडली आहे. त्यामुळे घरपट्टी कशी भरायची, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाल्याने मनपाच्या कारभारासह महसूल वसुलीचा फटका बसला आहे.
केवळ आरोग्य विभागाचे काम सुरू
महापालिका कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभाग, सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग, जन्म-मृत्यू दाखले विभाग, इमारत बांधकाम परवानगी विभागासह सर्व कार्यालयाचे कामकाज ठप्प आहे. केवळ आरोग्य विभागाचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी कार्यरत आहेत. शहरातील व्यवहारावर नजर ठेवणे, व्यवसाय सुरू असल्यास बंद करण्यासाठी नागरिकांना सूचना करणे, निर्जंतूक औषध फवारणी करणे, भाजी मंडई बंद करणे, होम क्वॉरंटाईन नागरिकांवर नजर ठेवणे अशा विविध जबाबदाऱया मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांवर सोपविण्यात आल्या आहेत. अशातच मनपातील 25 हून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मनपा कार्यालय ओस पडले असून कामकाज ठप्प झाले आहे.









