प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाणीपुरवठा ठप्प झाला आहे, तर दुसरीकडे जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. महाद्वार रोड परिसरात जलवाहिनीला गळती लागली असून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी लक्ष देतील का? अशी विचारणा होत आहे.
महाद्वार रोड संभाजी उद्यानाजवळ जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणात गळती लागली असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या परिसरात पाणी गटारीमधून वाहून जात आहे. गळती निवारणाकडे दुर्लक्ष केल्यानेच पाणी वाया जात असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. गळती निवारण वेळीच केली जात नसल्याने समस्या निर्माण होत असून नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गळतीमुळे नळांना उच्चदाबाने पाणी येत नाही. या गळतीचे निवारण तातडीने करावे, अशी मागणी होत आहे.









