महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला बाणासुराची कथा सांगताना पुढे म्हणतात –
जृंभणास्त्राची मूर्छना गेली । भक्तकारुण्यें कृपा उदेली । सवेग येवोनि कृष्णा जवळी । स्तुति आदरिली ते ऐका । भक्तानुकंपी पार्वतीरमण । चक्रायुधाप्रति येऊन । भक्तरक्षणार्थ मृदुभाषण । स्वमुखें स्तवन आदरिलें ।
बाणासुराचे हात तोडले जात असताना भक्तवत्सल भगवान शंकर, चक्रधारी भगवान श्रीकृष्णांजवळ आले व आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवंताची स्तुती करू लागले.
भो भो स्वामी चक्रायुधा । नेणोनि तुझिया वास्तव बोधा । बाण समरिं पावला युद्धा । ऐश्वर्य प्रबुद्धा हें न वटे । कां पां चित्र हें नव्हे म्हणसी । तरी ऐकावें इयेविशीं । तुझें गूढत्व शब्दब्रह्मासी । म्हणोनि वेदासी मौनमुद्रा । नामरूपवाच्यमान । वाङ्मयब्रह्मीं तच्छंसन । तूं अनाम अरूप अवाच्य पूर्ण । ब्रह्मनिर्गुण अविषय । नाम रूप करणविषय। ध्येय चिंत्य मनोविषय । तूं अचिंत्य अप्रमेय । ब्रह्म वाङ्मय न प्रकटी । ज्ञानगम्य जें जें झालें । नेति मुखें तें निगमीं त्यजिलें । अगम्य अगोचर ब्रह्म उरलें । गूढ राहिलें निगमींही । अगोचर कैसें म्हणसी जरी। तरी परंज्योति या श्रुतिनिर्धारिं । ज्योतिषांतेंही प्रकाशकारी । स्वप्रकाश स्वतः सिद्ध। सूर्यप्रमुखें ज्योतिर्मयें । तूतें प्रकाशूं शकती काये । तवाङ्गप्रभेच्या अन्वयें । ज्यांची सोय जग जाणें ।
यालागीं परंज्योतिपदें । वाङ्मय ब्रह्म तूंतें वदे ।
तरी कैं भजती योगिवृंदें । प्रतीति नांदे त्यां कैसी ।
ब्रह्मप्रतीतिगोचर नाहीं । तरी नास्तिक्मय सर्वां ठायीं ।
ऐसें न म्हणें शेषशायी । हेतु तद्विषयीं अवधारिं ।
विशुद्धमानस जे अमलात्मे । ज्यातें पाहती अमळप्रेमें। केवळ आकाशाचिये प्रतिमे । अभ्यासनियमें अनुभविती । एवं निर्गुणस्वरूप ज्ञान असो । सर्वांसी अगम्यमान । विराटविग्रह लीलेकरून । धरिला सगुण तो न कळे ।
सगुण असोनि कां पां न कळे । तरी ऐकावें अंबुदनीळें । उदुंबरवृक्षासि अनेक फळें । जंतु मोकळे फळगर्भीं । उदुंबरफळांत अंतर्वतीं । मशकां गोचर तत्प्रतीति । अनेक फळगर्भीची ज्ञप्ति । ते त्यांप्रति अगोचर ।
भगवान शंकर म्हणाले- हे प्रभो ! वेदमंत्रांमध्ये आपण तात्पर्यरूपाने गुप्त असणारे, परमज्योतिस्वरूप, परब्रह्म आहात. शुद्ध हृदयाचे महात्मे आपल्या आकाशाप्रमाणे सर्वव्यापक आणि निर्विकार अशा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात.
शिव म्हणे तव सगुण रूप । महत् म्हणिजे समष्टिकल्प । त्यांमाजी आम्ही व्यष्टि अल्प । मशकरूप उदुंबरिं । अखिल ब्रह्माण्डमय समष्टि । त्यामाजी जीव अल्प व्यष्टि । जीवां केंवि तुझी गोष्टी। अवगमे दृष्टी साकल्यें । समष्टिस्वरूप म्हणसी कैसें। वेदें विवरण केलें जैसें । तेंचि तुझिया कृपावशें । स्तवनमिषें निरोपितों । तुझा नाभि म्हणिजे गगन । वैश्वानर तुझें वदन । तुझें रेत तें जीवन । बीज संपूर्ण त्रिजगाचें । सुरलोक तें उत्तमाङ्ग । तुझे श्रवण ते दिग्विभाग । चरण केवळ हा भूभाग । नेत्र भग सोम मन ।
ऍड. देवदत्त परुळेकर








