चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लांबविला, शहापूर पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा फुले रोड, शहापूर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कम लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. त्यानंतर शनिवारी दुपारी या घटनेची नोंद शहापूर पोलीस स्थानकामध्ये झाली आहे. एकूण दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
महात्मा फुले रोड येथील दुर्गा अपार्टमेंटमधील प्रवीण दत्तात्रय पाटील यांच्या घरामध्ये ही चोरी झाली आहे. शुक्रवारी दुपारी घराला कुलुप लावून सर्वजण बाहेर गेले होते. यावेळी चोरट्यांनी दरवाजा फोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले 14 ग्रॅम सोन्याचे दागिने, 25 ग्रॅम चांदी आणि रोख 53 हजार रुपये लांबविले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांमध्ये फिर्याद द्यायची की नाही, या संभ्रमात कुटुंबीय होते. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी शहापूर पोलीस स्थानकात प्रवीण पाटील यांनी चोरी झाल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि फिर्याद नोंदवून घेतली आहे. सतत गजबजलेल्या ठिकाणी चोरी झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.









