व्यापारी गाळय़ांचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास
प्रतिनिधी/ बेळगाव
महात्मा फुले मार्केटमधील व्यापारी गाळय़ांचा दुरुपयोग होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. याबाबत वारंवार सूचना करूनही येथील अवैध प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे येथील गाळे बंदिस्त करण्यासाठी प्रवेशद्वार सील करण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने मंगळवारी करण्यात आली. यावेळी काही व्यापाऱयांनी आक्षेप घेऊन कारवाई करण्यास अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई पूर्ण करण्यात आली.
महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच नागरिकांना आणि व्यापाऱयांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने विविध ठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. व्यापारी संकुलांच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळतो. पण कांदा मार्केटशेजारी असलेल्या महात्मा फुले मार्केटच्या माध्यमातून महापालिकेला म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. भाजी विपेत्यांना बसून व्यवसाय करण्यासाठी व्यापारी संकुलाच्या आतील बाजूस कट्टे तयार करण्यात आले आहेत. सदर गाळे भाडेतत्त्वावर देण्यात येतात. काही ठरावीक भाडेकरू सर्व गाळे ताब्यात घेत आहेत. पण या ठिकाणी व्यवसाय केला जात नाही. सुसज्ज मार्केट असूनही भाजीवाले रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. त्यामुळे महात्मा फुले मार्केटचा वापर होत नाही. या व्यापारी गाळय़ांमध्ये केवळ साहित्य आणि भाजीपाला ठेवून गोडाऊन बनविण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात कोणीच फिरकत नसल्याने मद्यपान, धूम्रपान आदी कारणांसाठी व्यापारी संकुलाचा वापर होत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील गाळेधारकांना सूचना करण्यात आली होती. पण गैरप्रकारांना आळा बसला नाही. त्यामुळे गाळय़ांचे प्रवेशद्वार सील करण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्या महसूल विभागाच्यावतीने करण्यात आली.
कारवाई करण्यापूर्वी सूचना दिली नसल्याची तक्रार
ही कारवाई करतेवेळी स्थानिक व्यावसायिकांनी आक्षेप घेऊन प्रवेश बंद करण्यास विरोध दर्शविला. सदर गाळय़ांचे भाडे महापालिकेला जमा केले आहे. कारवाई करण्यापूर्वी कोणतीच सूचना दिली नसल्याची तक्रार गाळेधारकांनी केली. यामुळे कारवाईमध्ये अडथळा निर्माण झाल्याने पोलीस संरक्षण घेण्यात आले. त्यानंतर गाळेधारकांच्यावतीने वकिलांनी कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न केला. सदर गाळेधारकांना हटविण्यास स्थगिती आहे, असे सांगून कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी बजावलेल्या आदेशाची प्रत सादर करण्याची मागणी गाळेधारकांच्या वकिलांनी केली. न्यायालयीन स्थगिती असल्यास त्याबाबतचे आदेशपत्र दाखवा, अशी सूचना महापालिकेचे कायदा सल्लागार ऍड. यू. डी. महांतशेट्टी यांनी केली. सदर कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला असून, तो कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. त्यामुळे तो आदेश आम्ही इतरांना दाखवू शकत नाही, असे महापालिकेचे महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी सांगितले. तरीही उपस्थित व्यापाऱयांनी प्रवेश बंद करण्यास आलेल्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी हस्तक्षेप करून व्यापाऱयांना रोखले. सदर गाळय़ांचा दुरुपयोग होत असून, कोणत्याही भाडेकरूवर अन्याय केला जाणार नाही. सदर ठिकाणी प्रवेशद्वार बसविण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामात कोणीही अडथळा आणता कामा नये, असे बजावले. त्यानंतर व्यापारी गाळय़ांच्या प्रवेशद्वारावर पत्रे लावून सील करण्यात आले.
सुसज्ज असलेल्या व्यापारी संकुलाचा दुरुपयोग होत आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. रस्त्यावर बसणाऱया भाजी विपेत्यांमुळे वाहतुकीस अडचण होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे. त्यामुळे रस्त्यावर बसणाऱया व्यापाऱयांना गाळे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता संकुलाची डागडुजी करून सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव महापालिकेचा असल्याची माहिती महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांनी दिली.
कारवाईवेळी महापालिकेचे मार्केट निरीक्षक नंदू बांदिवडेकर, फारुक यड्रावी, बाबू माळण्णावर यांच्यासह महसूल निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड क्लार्क आणि मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.









