प्रतिनिधी / कुरुंदवाड
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कुरुंदवाड येथील अनिश मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलला मंजूर झाल्याने या परिसरातील ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होणार असल्याने ही योजना रुग्णांना वरदान ठरली आहे. असे प्रतिपाद आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले आहे.
कुरुंदवाड येथील अनिश मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना तसेच 14 अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष प्रति कुटुंब 1.5 लाख पर्यंत व किडनी प्रत्यारोपणाची 2.5 लाख पर्यंत मोफत शस्त्रक्रिया उपचार योजना शासनाने मंजूर केली असून या योजनेचा शुभारंभ ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयसिंगपूर उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर होते.
मंत्री यड्रावकर पुढे म्हणाले की शिरोळ तालुक्यात शिरोळ, जयसिंगपूर येथील दवाखान्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू होती. मात्र कुरुंदवाड व कुरुंदवाडच्या परिसराच्या ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत होती म्हणून या भागातील अनिश मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी उपलब्ध असल्याने या भागातील रुग्णांची सोय व्हावी यासाठी या हॉस्पिटलला ही योजना आपण मंजूर करून घेतली आहे. त्यामुळे स्त्री प्रसूती, किडनी, मुतखडा, व इतर अत्यावश्यक शस्त्रक्रिया मोफत होणार असल्याने हे हॉस्पिटल गोरगरीब रुग्णांना वरदान ठरणार आहे.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना अनिश हॉस्पिटलचे डॉ. अविनाश कोगनोळे म्हणाले की, कुरुंदवाड व या भागातील कोणत्याही दवाखान्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया सुविधा नव्हती. गेल्या दोन वर्षापासून यासाठी प्रयत्न सुरू होते हा प्रस्ताव आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडे गेल्यानंतर आठ दिवसात आम्हालाही मंजुरी मिळाली त्यामुळे या भागातील रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे शासनाने अनिश मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये ही योजना मंजूर केल्याने रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. रुग्णालयाला मंजुरी मिळाल्यापासून या दवाखान्यात 101 रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तर रुग्णांना मोफत जेवणाची सोय केली आहे. शासनाच्या या योजनेअंतर्गत कार्डधारकांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. तरी रुग्णानी या शासकीय मोफत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अविनाश कोगनोळे यांनी केले.
प्रारंभी आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले व रुग्णालयात असलेल्या साई बाबायांच्या मूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर व जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांचा सत्कार डॉ. अविनाश कोगनोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते धनपाल आलासे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नगरसेवक अक्षय आलासे, जवाहर पाटील, फारूक जमादार, माजी नगरसेवक शरद आलासे, जिन्नाप्पा भबीरे, दीपक पोमाजे,अभिजीत पाटील, डॉक्टर किरण अणुजे डॉक्टर किरण पवारउमेश कर्नाळे, मोनाप्पा चौगुले, शांतिनाथ कनवाडे, अरुण अलासे, आप्पासाहेब बंडगर, रमेश भुजुगडे, जय पोमाजे या मान्यवरांसह परिसरातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने हजर होते.








