प्रतिनिधी/ खेड
रायगड जिल्हय़ातील महाड-तळीये येथील 35 घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 50 मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित 40 हून अधिकजणांचा बचाव पथकांमार्फत शोध सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत गावकऱयांचे सांत्वन केले. सरकार पुनर्वसन व जल व्यवस्थापन आराखडा तयार करणार असल्याची माहितीही दिली.
दरड दुर्घटनेत रायगड जिल्हय़ात तळीये गावच जमीनदोस्त झाले आहे. आतापर्यंत 50 जणांचा बळी गेला आहे. नातेवाईकांच्या आक्रोशाने अवघे गाव सुन्न झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपाने असंख्य संसार उघडय़ावरच पडले आहेत. या दुर्घटनेत ढिगाऱयाखाली गाडले गेलेल्यांच्या शोधासाठी तिसऱया दिवशीही एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्ड यांची प्रत्येकी 2 पथके तर स्थानिक पातळीवरील 12 बचावपथके मदतकार्यात गुंतली होती. दिवसभरात 14 मृतदेह बाहेर काढण्यात पथकांना यश आले. उर्वरित बेपत्तांचा शोध जारी आहे. ढिगाऱयाखाली आणखी 40 हून अधिक जण असण्याची भीती व्यक्त होत असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
डोंगरदऱयातील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार आराखडा तयार करेल. नुकसान झाले आहे, त्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे स्पष्ट करत जल व्यवस्थापन आराखडाही तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वच ठिकाणी आपत्ती पथके पोहोचत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन करणारी माणसंच आहेत. पावसाची, वाहत्या पाण्याची अडचण आहे. मात्र, ही पथके जोमाने काम करत असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.
तातडीने रोख आर्थिक मदत द्याः देवेंद्र फडणवीस
कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषतः महाडनजीक घडलेल्या घटना पाहता तातडीची रोखीने आर्थिक मदत राज्य सरकारच्यावतीने दिली जावी. तसेच पिण्याचे पाणी, अन्न व कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा यांना प्राधान्यक्रम पाहिजे, असे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात येणारी संकटे पाहता राज्य सरकारने दूरगामी विचार करण्याची गरज आहे. तळीये गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा निर्माण करून द्याव्यात, त्यांचे धोकादायक क्षेत्राबाहेर पुनर्वसन असावे, अशा विविध मागण्याही फडणवीस यांनी केल्या आहेत.
महाड-हिरकणीतही दरड कोसळून घरांना तडे
तळीये येथील दरड दुर्घटना ताजी असतानाच महाड येथील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी येथेही दरड कोसळून घरांना तडे गेले आहेत. अतिवृष्टीच्या तडाख्यात येथील घरांच्या खालची माती खिळखिळी झाली आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हिरकणीवाडीच्या दिशेने मोठमोठे दगड येत आहेत. त्यातच पावसाचा माराही सुरू असल्याने दरडींचा धोका वाढला आहे. यामुळे ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. या वाडीतील काही ग्रामस्थ नजीकच्या वाडीत स्थलांतरीत झाले आहेत.









