महाडिक गटाच्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम, यापुढे पक्षीय भूमिका घेत करावे लागणार राजकारण
संजीव खाडे / कोल्हापूर
जिल्हÎाच्या राजकारणात सर्व पक्षीयांशी संबंध ठेवून स्वपक्षापेक्षा आपल्या गटाला महत्व देत सोयीचे राजकारण करण्याच्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाच्या पद्धतीवर नेहमीच टीका झाली. गेल्या तीन दशकात महाडिक आणि त्यांच्या पुढच्या पिढीनेही सोयीच्या राजकारणाची पद्धत कायम ठेवली. त्यामुळे महाडिक नेमके कुणाचे, तर ते कुणाचेच नाहीत, अगदी स्वपक्षाचे नाहीत तर केवळ महाडिक गटाचेच आहेत, अशा टीकेलाही त्यांना सामोरे जावे लागले. पण काळाचा महिमा म्हणा की राजकारणातील बदललेले प्रवाह म्हणा… पण आता महाडिक यांचा महाडिक गट ते भाजप असा प्रवास मात्र शुक्रवारी बिनविरोध झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीने अधोरेखित केला.
नव्वदच्या दशकाच्या अखेरीस महादेवराव महाडिक यांनी जिल्हÎाच्या राजकारणावर पकड मिळवली. प्रारंभी त्यांना लोकनेते खासदार (कै.) बाळासाहेब माने यांनी बळ दिले. त्यानंतर विद्यमान आमदार पी. एन. पाटील आणि गोकुळचे माजी ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी साथ दिली. महाडिक, नरके, पाटील अर्थात मनपा नावाने हे त्रिकुट ओळखू लागले. कोल्हापूर महापालिकेबरोबर गोकुळ, जिल्हा बँक व इतर सहकारी संस्थांवर या त्रिकुटाने वर्चस्व निर्माण केले. यामध्ये महाडिक यांची ताकद सर्वाधिक होती. कोणतीही गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य असणाऱया महाडिक यांनी राजकारण करताना व्यावसायिक दृष्टीकोन कायम ठेवला. राजकीय सोयीला प्राधान्य देताना त्यांनी पक्षीय निष्ठा, पक्षाचे तत्वज्ञान, विचाराला फारसे महत्व दिले नाही.
त्यामुळे महाडिक जरी काँग्रेसचे असले तरी त्यांचे सर्व पक्षांशी संबंध राहिले. पक्षात असूनही सोयीच्या राजकारणासाठी त्यांनी ताराराणी आघाडीचा फॉर्म्युला, प्रयोग केला. तो कमालीचा यशस्वी ठरला. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत एका प्रभागात चार उमेदवांराना बळ देत महाडिक यांनी विजयी तो माझा असे राजकारण करताना प्रसंगी पक्षीय जोखड बाजूला ठेवत स्वतःची राजकीय शक्ती निर्माण केली. व्यावसायिक राजकारणाचे हे फलित होते. पक्षात राहूनही पक्षहिता ऐवजी महाडिक गटाचे राजकारण करताना महाडिक यांना यशही मिळत गेले. त्यामध्ये त्यांना साथ देणाऱयांचाही फायदा झाला. महाडिक कधी कधी पक्षापेक्षाही मोठे झाले होते. 2009 मध्ये राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी नाकारून संभाजीराजेंना दिली. तेंव्हा महाडिक गटाने अपक्ष लढलेल्या (कै.) तत्कालिन खासदार सदाशिवराव मंडलिक यांना बळ दिले होते. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक खासदार मंडलिकांचे पुत्र विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक विरोधात राष्ट्रवादीकडून लढून जिंकले होते.
त्याच प्रा. मंडलिक यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांना पराभूत केले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे विधानपरिषदेवर आमदार असणाऱया महादेवराव महाडिक यांनी आपले पुत्र अमल महाडिक यांना भाजपमध्ये पाठवून काँग्रेसचेच उमेदवार व विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामध्ये 18 दिवसात अमल महाडिक सतेज पाटील यांचा धक्कादायक पराभव करून आमदार झाले होते. त्यावेळी महादेवराव महाडिक यांनी काँग्रेस विरोधी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीत असूनही भाजपच्या अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. त्यावेळी महाडिक गट, घराणे आणि बंधूभावाची भूमिका राहिली होती. त्यात महाडिक यांनी पक्षापेक्षा स्वहिताचे राजकारण आणि सोयीला प्राधान्य दिले होते. त्याचा परिणाम महाडिक गटाच्या पुढील राजकारणावर झाला.
2015 मध्ये विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने महादेवराव महाडिक यांना उमेदवारी नाकारत सतेज पाटील यांना दिली. त्यावेळी महाडिक यांनी बंडखोरी केली. भाजप व इतर पक्षांची मदत घेतली पण ते यशस्वी झाले नाहीत. तेथून महाडिक यांच्या राजकारणाची दिशा बदलत गेली. 2019 च्या लोकसभेला धनंजय महाडिक पराभूत झाले तर विधानसभेत अमल महाडिक यांना हार पत्कारावी लागली. दोन्हीकडे सतेज पाटील यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचा फटका महाडिक गटाला बसला. त्यानंतर महाडिक गट ते भाजप असा प्रवास सुरू झाला.
2021 च्या विधानपरिषदेत हा प्रवास भाजप या पक्षावर येऊन थांबला. 2015 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर पक्षादेशा धुडकावून लावत बंडखोरी करणारे महादेवराव महाडिक आणि 2021 मध्ये भाजपने तिकीट दिल्यानंतर माघारीचा आदेश काढल्यावर उमेदवारी अर्ज मागे घेणारे अमल महाडिक यातून महाडिक गटाच्या पक्षीय प्रवासाला पूर्णविराम लागला. हा काळाचा महिमा होता. याआधी लार्जर दॅन पार्टी अर्थात पक्षापेक्षा मोठे असणाऱया महाडिकांना पक्षाबरोबरच राहावे लागणार आहे. पक्षाच्या सोयीचे राजकारण करावे लागणार आहे.
राजकारणातील चढउतार
2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपच्या कमळ चिन्हावर लढलेल्या अमल महाडिक यांना 2021 मध्ये त्याच सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपकडून लढण्याची तयारी केल्यानंतर पक्षादेशानुसार माघार घ्यावी लागली. राजकारणातील चढ-उतारात महाडिक यांनी प्रथमच पक्षादेशाचे पालन केले. यापुढे त्यांना पक्षाच्या सोयीचे राजकारण करत वाटचाल करावी लागणार आहे.