प्रतिनिधी/ गडहिंग्लज
गडहिंग्लज-नेसरी मार्गावर सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात अशोक लक्ष्मण जाधव (वय 74, रा. बसर्गे, ता. गडहिंग्लज) हे गंभीर जखमी झाले होते. त्याना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयाला नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद गडहिंग्लज पोलिसात करण्यात आला आहे.
मयत अशोक आणि त्यांचा मुलगा सागर जाधव (वय 19, रा. बसर्गे) हे दोघे सोमवारी सायंकाळी 6.15 वाजता मोटरसायकलवरून नेसरीला जात होते. गडहिंग्लज-नेसरी या मार्गावरील महागावच्या हद्दीत कोपार्डे यांच्या घरासमोर रस्त्यावर सागर याला मोटरसायकल आवरली नसल्याने रस्त्याच्या काठाळीवरून गाडी स्लिप होऊन सागर आणि अशोक जाधव हे दोघेही रस्त्यावर पडले. यात अशोक जाधव यांच्या डोकीस मार लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी हत्तरकी हॉस्पीटल येथे आणण्यात आले. तेथून उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूरला घेऊन जात असताना अशोक जाधव यांची तब्बेत जास्तच बिघडल्याने त्यांना गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच त्यांचे निधन झाले. या अपघाताची फिर्याद सुनिल जाधव (वय 36, रा. बसर्गे) यांनी गडहिंग्लज पोलिसात दिली आहे. अपघात प्रकरणी सागर जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार संभाजी कोगेकर करत आहेत.









