राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा : म. ए. समितीला मतदान करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवनावश्यक साहित्याचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. सध्या मात्र अन्नधान्य, तेल, गॅस यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार महागाई कमी करण्यात पूर्णपणे फोल ठरले आहे. महागाई वाढीचा फटका सर्वाधिक महिलांना सहन करावा लागतो. त्यामुळे येत्या निवडणुकीत म. ए. समितीच्या शुभम शेळके यांना मतदान करून ही महागाई आटोक्मयात आणण्यासाठी प्रयत्न करूयात, असे विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मांडले.
म. ए. समिती महिला आघाडीच्यावतीने मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी गुरुवारी मराठा मंदिर येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर मधुश्री पुजारी, रेणू मुतगेकर, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे उपस्थित होत्या. म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी उपस्थित महिलांना मतदान करण्याचे आवाहन केले.
जि. पं. सदस्या सरस्वती पाटील म्हणाल्या, सीमाप्रश्न हा मराठी भाषिकांचा आत्मा आहे. त्यामुळे मराठी भाषिक सीमाप्रश्नापासून दूर होणार नाही, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षा रेणू किल्लेकर प्रास्ताविकावेळी म्हणाल्या, सीमालढय़ात पहिल्यापासून महिलांचा सक्रीय सहभाग आहे. मध्यंतरी याला मरगळ आली होती. परंतु आता मात्र महिला आघाडीमुळे या चळवळीत पुन्हा महिला सक्रीय झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी महापौर सरिता पाटील म्हणाल्या, आम्ही पदांसाठी नाही तर सीमाप्रश्नासाठी काम करतो. काहींनी आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही आजही म. ए. समितीचेच काम करीत आहोत. इतरांप्रमाणे संघटना बदलत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका वैशाली हुलजी, कल्पना पालेकर, अनिता किटवाडकर, किशोरी कुरणे यांच्यासह 50 हून अधिक मंडळांच्या 500 हून अधिक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









