पत्रकाराला उद्देशून दिली शिवी
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेतील वाढत्या महागाईवर प्रश्न विचारण्यात आल्याने अध्यक्ष जो बायडेन नाराज झाले आणि त्यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱया पत्रकाराला शिवी दिली. बायडेन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर डूसी यांनी देशात सातत्याने वाढणाऱया महागाईमुळे मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीला किती फटका बसणार असे विचारले होते. यावर बायडेन यांनी यामुळे नुकसान नव्हे तर फायदा होईल असे उत्तर दिले आणि त्यानंतर पत्रकाराला ‘स्टूपिड सन ऑफ बिच’ संबोधिले आहे.
बायडेन यांनी यापूर्वीही अनेकदा पत्रकारांना फटकारले आहे. मागील आठडय़ात फॉक्स न्यूजच्या एका महिला पत्रकाराने युक्रेनप्रकरणी रशियाच्या राष्ट्रपतींकडून पहिले पाऊल उचलण्याची प्रतीक्षा करत आहात का असे विचारले होते. यावर बायडेन यांनी संतापून ‘काय मूर्खतापूर्ण प्रश्न आहे’ असे म्हटले होते.
बायडेन यांच्यासमोर समस्यांचा डोंगर
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांना सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अफगाणिस्तानातून सैन्याच्या माघारीचा मुद्दा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरत आहे. लोकप्रियतेप्रकरणी एका सर्वेक्षण कंपनीने त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही खालचे स्थान दिले आहे. यादीत ट्रम्प 13 व्या तर बिडेन हे 20 व्या स्थानावर आहेत.









