वरकुटे-मलवडी / वार्ताहर :
एकीकडे कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करीत असतानाच वाढणाऱ्या महागाईमुळे आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र मेटाकुटीला आला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वरचेवर वाढत असतानाच घरगूती गॅस, गोडेतेल यांचे दरही वरचेवर वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिक महागाईने हैराण झाला असतानाच गेल्या दोन महिन्यापासून साखरेचे दरही गगनाला भीडत आहेत. दोन महिन्यापूर्वी ३२ किलो दराने मिळणारी साखर सध्या ४० रुपये किलो या दराने विकत घ्यावी लागत आहे. आगामी सण – उत्सवाच्या काळात साखरेचा किरकोळ विक्रीचा दर बाजारात ४० रुपये किलोपर्यंत गेला आहे. गेल्या काही महिन्यातील हा उच्चांकी दर समजला जात आहे.
ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंंचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जीवन जगणे अवघड होत आहे. आता तर महागाईच्या या खेळांमध्ये गोड साखरेनेही उडी घेतली आहे. कोरोना संसर्गाच्या या काळात साखरेचे दर स्थिर होते. उत्पादन जास्त आणि मागणी कमी यामुळे साखरेचे दर स्थिर होते असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पंरतु सध्या सुधारलेल्या वातावरणामुळे व जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने हॉटेल्स, मिठाईची दुकाने सुरू झाल्याने साखरेला मागणी वाढली आहे. साखरेचा ३३०० रुपये क्विंटल विक्री दर निश्चित करण्यात आला असून, साखर कारखान्यातील साखरेची गोदामे गच्च भरलेली आहेत. तरीही बाजारात भाव वाढू लागले आहेत.