ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गेल्या आठवड्यात अमूल, ‘गोकुळ’ने दूध विक्रीच्या दरात वाढ केली. त्यानंतर आता मदर डेअरीच्या दूधाचे दरही वाढवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मदर डेअरीने फक्त दिल्ली आणि एनसीआरमध्येच दरवाढ केली आहे. त्यामुळे दिल्ली-एनसीआर वगळता इतर ठिकाणच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

अमूल आणि गोकूळनंतर मदर डेअरीने दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीचे वाढीव दर उद्यापासून (11) लागू करण्यात आले आहेत. आता मदर डेअरीचे दूध खरेदी करताना दिल्ली आणि एनसीआरमधील ग्राहकांना दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. मदर मदर डेअरीने यापूर्वी 2019 मध्ये दूधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सर्व प्रकारच्या दूधावर ही दरवाढ लागू असणार आहे, अशी माहिती मदर डेअरीने दिली आहे. गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून, कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर करोना महामारीमुळे दूध उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचं कंपनीने म्हटले आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर क्रीम दूध 55 रुपयांऐवजी 57 रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही 45 रुपयांवरून 47 रुपये झाले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरी दिवसाला 30 लाख लिटरपेक्षा अधिक दूधाची विक्री करते. इंधनाचे वाढते दर आणि मनुष्यबळाचा वाढलेल्या खर्चामुळेही ही दरवाढ करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दूधाचे दर वाढल्याने तूप, लोणी, चीज, लस्सी आणि ताकाच्या दरात देखील वाढ होण्याची संभावना आहे. यासोबतच मिठाई, चॉकलेट आदी गोष्टी महाग होऊ शकतात. तसेच दूधाची किंमती वाढल्याने याचा परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे.









