बेळगावच्या तरुणाचा समावेश :16 कार जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
गोव्यातील कॅसिनोमध्ये चैनी करण्यासाठी महागडय़ा कार चोरणाऱया एका टोळीला बेंगळूर येथील पुलकेशीनगर पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये बेळगावच्या तरुणाचा समावेश आहे. त्यांच्याजवळून सुमारे 5 कोटी रुपये किमतीच्या 16 कार जप्त करण्यात आल्या आहेत.
जुबेर शरीफ (वय 30) रा. के. जी. हळ्ळी, बेंगळूर, मनीष (वय 33) रा. वसंतनगर बेंगळूर, सय्यद इमाम (वय 23) रा. बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. मनीष व सय्यद इमाम हे दोघे सेकंड हँड कार खरेदी-विक्रीचा क्यवसाय करतात. गरजूंना कार ठेवून घेऊन त्याच्या बदल्यात पैसे देतात.
महागडय़ा कार गहाण ठेवून घेऊन पैसे दिल्यानंतर तशा कारची विक्री करण्यात येत होती. यासाठी कारचा नोंदणी क्रमांक बदलून खोटी कागदपत्रे तयार करण्यात येत होती. बेंगळूर येथील प्रसिद्ध उद्योजक आदिकेशवलू यांच्या नातवाने या टोळीकडे कार गहाण ठेवून 25 लाख रुपये उचलले होते. हैद्राबादमधील एका व्यक्तीला दीड कोटी रुपयांना त्या कारची विक्री करण्यात आली.
के. जी. हळ्ळीच्या जुबेरने नवी दिल्ली येथे पाच महागडय़ा कार चोरून त्या मनीष व सय्यदच्या हाती दिल्या. त्यानंतर या तिघांनीही बनावट कागदपत्रे तयार करून त्यांची विक्री केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्याजवळून जी-व्हॅगन, फॉर्च्युनर, रेंजरोव्हर आदी महागडय़ा कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.









