वाहनांसाठी अडथळा : रस्ता बांधकाम कंपनीचा निष्काळजीपणा उघड
प्रतिनिधी /पेडणे
महाखाजन धारागळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने एकेरी महामार्ग वाहतुकीसाठी काही काळ बंद राहिला. रस्ता तयार करताना रस्ता बांधकाम कंपनी एम.व्ही.आर.ने निष्काळजीपणे केलेल्या कामाचा प्रत्यय पहिल्याच पावसात आला.
सकाळी हे दरड कोसळल्याने भला मोठा दगड रस्त्यावर येऊन पडला. तसेच मातीचा ढिगारा हा रस्त्यावर आला. त्यामुळे म्हापसा-पेडणेच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.
महाखाजन येथे राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करताना या ठिकाणी उंच डोंगराचा भाग हा कापून काढताना योग्य उताराचे स्वरूप दिले नाही. त्याची उभी कडा तयार झाली. रस्त्याला अगदी लागून असल्यामुळे ही दरड कोसळून मातीचा ढिगाऱयासह मोठा दगड व माती मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर आली. त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद झाला.
सुदैवाने जीवित हानी टळली
ही दरड कोसळली त्यावेळी या टप्प्यात वाहने नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. संबंधित यंत्रणेने या रस्त्याच्या कामाकडे सतर्कतेने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









