केरळ राज्यपालांकडून आरती अन् जप
वृत्तसंस्था/ उज्जैन
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान शनिवारी सकाळी उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंगच्या सकाळच्या आरतीत सामील झाले. सकाळी 7.30 वाजता महाकाल मंदिरात पोहोचलेले राज्यपाल शिवभक्तीत रमल्याचे दिसून आले. त्यांनी ओम नमः शिवाय मंत्राचा जप देखील केला आहे.
भगवान महाकालासमोर प्रार्थना करत देशाचे कल्याण आणि समृद्धीची कामना केली आहे. देश मोठय़ा संकटातून जात आहे. जगाला कोरोना संकटातून बाहेर काढावे अशीच देवाकडे प्रार्थना आहे. देश पुन्हा वेगाने विकासाच्या दिशेने पुढे जावा असे आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे.

राज्यपाल आरिफ हे शुक्रवारी संध्याकाळीच उज्जैनमध्ये पोहोचले होते. त्यांनी देवास येथील अतिथीगृहात रात्री वास्तव्य केले, त्यानंतर शनिवारी सकाळी ते आरतीत सामील होण्यासाठी महाकाल मंदिरात पोहोचले. राज्यपालांनी विधिवत भगवान महाकालाचे पूजन केले आहे. आरतीनंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दुबे आणि महाकाल मंदिराच्या सहाय्यक प्रशासकीय अधिकाऱयांनी शाल आणि श्रीफळ तसेच महाकालाचा प्रसाद देत राज्यपालांचा सन्मान केला.
23 एप्रिल 1985 रोजी सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो खटल्यात ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निर्णयात मुस्लीम महिलांना तलाकनंतर निर्वाहभत्ता देण्याची तरतूद होती. या निर्णयाला मुस्लीम धर्मगुरुंनी तीव्र विरोध केला होता. याच्या दबावातून तत्कालीन राजीव गांधी सरकारने ‘मुस्लीम महिला अधिनियम, 1986’ संमत करविला होता. राजीव गांधी यांच्या या घुमजावामुळे नाराज होत आरिफ मोहम्मद खान यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.









