पाचव्या अंकात शेवटी पावसाच्या माऱयामुळे भिजलेली वसंतसेना चारुदत्ताकडेच राहते. त्यांचा श्रुंगार बहरतो. पावसाने त्यात अधिकच भर टाकलेली असते. विदूषक त्या दिवसाला दुर्दिन असे नाव देतो. तेच नाव ह्या पाचव्या अंकाला लेखक देतो आणि दुर्दिन नावाचा हा पाचवा अंक संपतो. सहाव्या अंकातील पहिल्या प्रवेशात चेटी प्रवेश करते. तिला वसंतसेना कुठे दिसत नाही. ती अजूनही झोपलीच आहे की काय असे तिला वाटते. म्हणून तिला उठवायला ती निघून जाते. थोडय़ाच वेळात वसंतसेना तिथे येऊन तिला धूताला तिची रत्नावली परत करण्याविषयी सांगते. पण स्वाभिमानपूर्वक धूता त्याला नकार देते हे आपण यापूर्वी पाहिले.
सहाव्या अंकाच्या दुसऱया प्रवेशात रदनिका चारुदत्ताच्या मुलाबरोबर गाडीने खेळण्यासाठी त्याला बोलावते. तेव्हा तो छोटा मुलगा म्हणतो, ‘मला नको ही मातीची गाडी. मला ती सोन्याची गाडी पाहिजे.’ असा हट्ट करतो. त्यावर रदनिका त्याला
समजावते की, ’बाळा, आपल्याकडे सोनं कुठे आहे? तुझ्या वडिलांकडे पुन्हा श्रीमंती आली की, ते तुला सोन्याची गाडी आणून देतील.’ ती त्याला वसंतसेनेकडे घेऊन जाते. तो कुणाचा मुलगा आहे असे ती विचारते. तेव्हा रदनिका तो चारुदत्ताचा मुलगा असून त्याचे नाव रोहसेन असल्याचे सांगते. तो चारुदत्तासारखाच सुंदर आहे. ती त्याचे कौतुक करून त्याला आपल्या मांडीवर बसवून घेते. त्याच्या रडण्याचे कारण विचारते. तेव्हा रदनिका सगळी हकीगत सांगते. तो शेजारच्या मुलाबरोबर सोन्याच्या गाडीने खेळत होता. तीच गाडी तो घरी घेऊन आला. तेव्हा तिने त्याच्यासाठी मातीची गाडी बनवून दिली. पण त्याला ती आवडत नाही आणि सोन्याच्या गाडीसाठीच हट्ट धरून बसलाय, ते ऐकून वसंतसेनेला वाईट वाटते. ती त्याला आपण सोन्याच्या गाडीने खेळू म्हणून सांगते.
इतक्मया प्रेमळपणे वागणारी, सोन्याची गाडी देण्याचे कबूल करणारी ही बाई कोण? असा बालसुलभ प्रश्न त्याला पडतो. तेव्हा रदनिका त्याची समजूत घालते की, ‘ही सुद्धा तुझी आईच आहे असं समज!’ पण तो ते खरे मानत नाही. ‘ही जर माझी आई असेल, तर इतकी दागदागिन्यांनी का सजल्ये?’ असा प्रश्न तो विचारतो. हे ऐकून वसंतसेनेला वाईट वाटते. ती अंगावरचे दागिने काढते आणि विचारते, ‘आता तरी मी तुझी आई झाले ना? आता हे दागिने घे आणि तुला सोन्याची गाडी बनवून घे.’ रदनिका त्याला तिथून घेऊन जाते.
ह्या प्रवेशातील घटनेवर आधारित ह्या नाटकाचे नाव ‘मृच्छकटिक’ ठेवले आहे हे लक्षात येईल. मातीच्या गाडीबरोबर न खेळणाऱया रोहसेनबरोबरचे वसंतसेनेचे वागणे ती किती संवेदनशील आहे हे सांगून जाते. ती गणिका चारुदत्तावर केवळ वासनात्मक प्रेम करीत नाही, तर त्याच्या प्रत्येक सुखदुःखात ती भागीदार असते.








