राजा शकुंतलेला ओळखत नाही. तिच्याशी लग्न केल्याचेही कबूल करत नाही. तेव्हा शकुंतलेच्या रागाचा पारा चढतो. तिचा राग खरा असल्याचे त्याला वाटते. तेव्हा तो स्वतःच्या चारित्र्याचाही दाखला देतो. पण लग्न केल्याचे आठवत नाही. तेव्हा पुन्हा शकुंतला म्हणते, ‘मग पुरूवंशाच्या थोरवीच्या जोरावर ओठात गोड आणि पोटात लबाड अशा कपटय़ाच्या तावडीत जाऊन मी स्वच्छंदी ठरले हे योग्यच झाले म्हणायचे!’ ती रडू लागते. तेव्हा शार्ङ्गरवही तिला थोडे सुनावतो. एखाद्याशी गुप्तपणे सलगी करायची, तर ती पारखूनच केली पाहिजे. अपरिचित माणसाशी केलेली मैत्री स्वतःवरच उलटते. शारङ्गरव तिच्यावरच विश्वास ठेवून राजाला दोष देत होता. जिला जन्मात कधी कपट हा शब्द माहित नाही, तिच्या शब्दांना मान न देणे हे एखाद्या ठकबाजीच्या कलेत निष्णात असलेल्यालाच जमते असे तो राजाला म्हणत होता. ते ऐकून हिला फसवून आम्हांला काय मिळणार? असे राजा उलट त्याला विचारत होता. ‘अधःपात’ एवढेच उत्तर मिळते. दोघांचा चाललेला वाद ऐकून शारद्वत समजावतो, की शब्दाने शब्द वाढवण्यात अर्थ नाही. आपण राजाला गुरूजींचा निरोप दिला आहे. तेव्हा आता आपण परत जाणे इष्ट! राजाला तो सांगतो की,‘ही तुझी पत्नी आहे. हिला स्वीकारायचे की टाकून द्यायचे हे तू ठरव. ह्या जगात पती हाच पत्नीचा परमेश्वर मानला जातो. गौतमी तू हो पुढे!’ सारेजण तिथून निघतात.
हा कठोरपणा पाहून शकुंतला रडू लागते. मला इथे एकटय़ाला टाकून जाऊ नका म्हणून विनवू लागते. तेव्हा गौतमीही त्या दोन तपस्व्यांना सांगते की, पतीने तर तिला अव्हेरलेच आहे. पण आपणही तिला वाऱयावर सोडून गेलो, तर तिने काय करावे? तेव्हा शार्ङ्गरव तिला अद्वातद्वा बोलतो. तिला नाचरी, कुलटा असे कायकाय बोलतो. तेव्हा राजाही शकुंतलेची ते फसवणूक का करताहेत असे विचारतो. तेव्हा शार्ङ्गरव त्याला फटकारतो की, तुझे मन दुसरीकडे गुंतल्याने तुला गतगोष्टींचा विसर पडलाय. पण पापभीरू म्हणवणाऱयांकडून पत्नीत्याग घडेल त्याची जबाबदारी कोणावर? राजा त्यावर उपाय काय ते विचारतो. तेव्हा पुरोहित त्याला सांगतो की, ‘हिची प्रसूती होईपर्यंत ती आमच्या घरी राहिल. साधूंनी दिलेल्या आशीर्वादानुसार तुझा पहिला पुत्र चक्रवर्ती आहे असे सांगितले आहे. ह्या मुनीकन्येच्या पुत्राच्या ठिकाणी ही लक्षणे आढळली, तर तू हिचा स्वीकार कर. अन्यथा हिला पित्याच्या स्वाधीन करावी.’ हे ऐकून शकुंतलेला ही पृथ्वी आपल्याला पोटात घेईल, तर बरे असे वाटते. ती रडत पुरोहितांच्या मागोमाग जाते. शापामुळे स्मृतीभ्रष्ट झालेला राजा शकुंतलेचा विचार करू लागतो.








