चौथ्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात अनसूया आणि प्रियंवदा फुले वेचण्याचा अभिनय करीत मंचावर येतात. त्या दोघींच्या संवादातून प्रेक्षकांना कळते की, राजा आणि शकुंतलेचा गांधर्वविधीने विवाह पार पडला आहे. तिला योग्य पती मिळाला म्हणून दोघींना समाधान वाटतेय. पण तरी एक शंका त्यांना आहे की, राजषी याग वगैरे करून राजधानीला गेल्यावर अंतःपुरातल्या स्त्रियांच्या गराडय़ात शकुंतलेला विसरून तर नाही ना जाणार? पण सद्गुणी थोर व्यक्तींकडून असे काही घडणे अशक्मय आहे, असेही त्यांना वाटते. पण चिंता वाटते ती कश्यपबाबा परत आल्यावर त्यांची ह्या घटनेवर काय प्रतिक्रिया होईल याची! अनसूया म्हणते की, ‘तसेही बाबांची इच्छा आपली कन्या गुणवानाला द्यायची अशीच आहे. मग हे तर सारे त्यांच्या मनाप्रमाणेच घडते आहे!’ बोलता बोलता त्यांची पुरेशी फुले वेचून झाली होती. पण आता शकुंतलेच्या सौभाग्यदेवतेची पूजा करण्यासाठी आणखी फुले हवीत हे लक्षात येताच त्या आणखी फुले वेचू लागतात.
तेवढय़ात पडद्यातून आवाज येतो, ‘मी आलो आहे’! त्या दोघी जाण्याची गडबड करू लागतात. कारण कुणी तरी अतिथी आले आहेत हे त्यांना समजते. पण तिकडे कुटीत शकुंतला असेल, ती त्यांचे आदरातिथ्य करील असे वाटते. पण शकुंतलेचे चित्त थाऱयावर नसते. पुन्हा पडद्यातून आवाज येतो. ‘काय मला अतिथीला लाथाडतेस?’ पाठोपाठ शापवाणीही ऐकू येते. ‘ज्याचे अनन्यभावाने मनात चिंतन करतेस आणि दारी आलेल्या एका तपोधनाला मानही देत नाहीस. म्हणून तू जेव्हा त्याला ओळख सांगायला जाशील, तेव्हा त्याला आधीचे काहीही आठवणार नाही!’ दोन्ही सख्यांना ते ऐकून नेमके नको तेच घडले असे वाटले. कारण त्यांना लांबून शीघ्रकोपी दुर्वासऋषी शाप देऊन झपाझप लांब लांब पावले टाकत फणकाऱयाने निघालेले दिसतात. त्यांना अडवणे शक्मय नसते.
तरीही त्यांच्या पाया पडून आणण्यासाठी आणि त्यांच्या आदरसत्कार आणि पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दोघी सख्या लगबगीने जातात. त्या शकुंतलेची रदबदली त्यांच्याकडे करतात. त्या विनंती करतात ‘भगवन्, तपाचा प्रभाव न जाणणाऱया आपल्या मुलीचा हा पहिलाच एकमेव अपराध आहे. हे जाणून आपण तो पोटात घालावा!’








