प्रियंवदा आणि अनसूया राजाला शकुंतलेला नीट वागवण्याबद्दल सांगतात. राजाही ह्या पृथ्वीनंतर तुमची सखी हीच माझा आधार असल्याचे सांगतो. त्यामुळे दोघींचे समाधान होते. तेवढय़ात प्रियंवदेला आईसाठी घाबरा झालेला हरिणबालक दिसतो. त्याची त्याच्या आईशी गाठ घालून देण्यासाठी दोघी सख्या तिथून जाऊ लागतात. तेव्हा शकुंतला तिला एकटीला सोडून जाऊ नका म्हणून सांगते. तेव्हा त्या तिला चिडवतात की, ‘साऱया पृथ्वीचा रक्षणकर्ता तिच्याजवळ असताना आमची काय गरज?’ दोघी तिथून निघून जातात. राजाही तिला धीर देतो. तो तिला विचारतो की, ‘की कमळाच्या पाकळय़ांचा पंखा करून तुझा श्रमपरिहार होण्यासाठी तुला वारा घालू का? की तुझे हे कमळासारखे तांबूस रंगाचे कोमल पाय माझ्या मांडीवर घेऊन चेपून देऊ का? तू घाबरू नको. हा सेवक तुझ्याजवळच आहे!’
ते ऐकून शकुंतला ‘मी पूज्य व्यक्तीचा माझ्याकडून उपमर्द होऊ देणार नाही’ असे म्हणून जाऊ लागते. पण राजा तिला जाऊ देत नाही. अजून दिवस मावळायचाय. तरी तू एवढी दमली आहेस. असे बोलून तिला परत यायला लावतो. तेव्हा आपल्या मर्यादेचे भान राखत शकुंतला त्याला सांगते की, मी जरी तुमच्यावर अनुरक्त असले, तरी मी स्वतःची मुखत्यार नाही. पण राजा इतका उतावीळ झालेला असतो की, तिने अजिबात घाबरू नये असे सांगतो. तिची भेट झाल्यावर धर्मज्ञ असे कुलपतीही तिच्याकडून काही गैर झाले आहे असे मानणार नाहीत. कारण अशा कितीतरी राजकन्या गांधर्वविधीने विवाहित झाल्या आहेत. त्यांनाही वडिलधाऱयांनी संमती दिली आहे. राजा तिला बाहुपाशात घेतो. ती सोडायला सांगते, तरी तो सोडत नाही. ‘ह्या नवकोमल अशा कुसुमाला भुललेला भुंगा त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय सोडणार नाही!’ असे म्हणतो. तेवढय़ात पडद्यात ‘चक्रवाकप्रिये, तू आपल्या प्रियकराला निरोप दे. कारण रात्र पडू लागली!’ असा आवाज ऐकू येतो.गौतमीमाई शकुंतलेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी येत असते. ते पाहून ती राजाला झाडाच्या आड होण्यासाठी सांगते. दोघेही लपतात. तेवढय़ात दोन सख्यांसाहित हातात तीर्थपात्र घेऊन असलेली गौतमी तिकडे येतात. गौतमी शकुंतलेला तिच्या अंगाचा दाह कमी झाला का विचारते. तेव्हा ती आता बरे असल्याचे सांगते. गौतमी तिच्या मस्तकावर दर्भोदक शिंपडते आणि सर्वजणी कुटीकडे जायला निघतात.








