सेनापती राजाकडे येतो तेव्हा तो सांगतो की, मृगयेसाठी वनातली श्वापदे उन्हातान्हात हिंडून कसलीही पर्वा न करता घेरून ठेवली आहेत. तरी आपली स्वारी अजून तिकडे आली नाही. तेव्हा राजाला विदूषकाचा राग आलेला असतो. त्याच्यामुळेच आपली मृगयेविषयीची उत्कंठा कमी झाली असे त्याला वाटते. तेव्हा विदूषकाला सेनापती हळूच पाठिंबा देतो. स्वतः मात्र आपण राजाच्या बाजूचे आहोत, असे दाखवतो. तो उघडपणे राजासमोर विदूषकाला नावे ठेवू लागतो.
तो सांगतो की, हातात धनुष्यबाण घेऊन चंचल प्राण्यांची शिकार करताना अंगी चापल्य येते, स्थूलपणा जातो, पोटही कृश होते. त्यामुळे जे लोक शिकारीला नावे ठेवतात ते खरे नाही. तेव्हा विदूषक उगीच राजाला शिकारीच्या भरीस पाडू नको असे सांगतो. तूही नाहीतर एखाद्या चवताळलेल्या अस्वलाची शिकार होशील असे
सांगतो.
राजा मात्र सेनापतीला सांगतो की, सेनापती, तुम्ही आश्रमाच्या अगदी नजीक आले आहात त्यामुळे शिकार करण्याच्या तुमच्या म्हणण्याला मला मान देता येत नाही! तेव्हा इथल्या पशुंना आज मुक्तपणे वावरू दे. म्हणून हाका घालायला गेलेल्या सर्व सैनिकांना परत बोलवा. तपोवनाला कसलाही उपसर्ग पोचता नये अशी त्यांना ताकीद द्या. राजाची आज्ञा पाळत सेनापती निघून जातो. राजा सेवकाला आपला शिकारीचा पोषाख परत न्यायला सांगतो. सगळे सेवक आपापल्या जागी जातात. तेव्हा विदूषक खुश होतो आणि राजाला झाडाच्या दाट सावलीत बसायला सांगतो. स्वतःही मोकळेपणाने बसतो. विदूषकाचे नाव ‘माढवी’ आहे. राजा म्हणतो, ‘माढव्या, तुला दृष्टीचे परम साफल्य अजून लाभलेच नाही. कारण जे बघायला हवे ते तू अजून बघितलेच नाहीस.’ माढवीला तो कशाबद्दल बोलतोय ते समजत नाही. तेव्हा राजा आश्रमकन्या शकुंतलेला त्याने अजून पाहिले नसल्याचा खुलासा
करतो.
राजाचे बोलणे ऐकून माढवी राजाला म्हणतो, ‘एखाद्या तपस्वीकन्येची अभिलाषा करणे हे तुला बरे दिसत नाही!’ पण राजा उलट त्याला म्हणतो की, निषिद्ध वस्तूवर पौरवांचे मन कधीच जात नाही.
त्यावर विदूषक मार्मिकपणे म्हणतो, ‘खजूर खाऊन विटलेल्याला जशी कधी चिंच खाण्याची इच्छा होते, तशी उत्कृष्ट स्त्रियांचा अनादर करण्याची तुझी इच्छा आहे….. ज्याअर्थी तुला ज्याने चकित केले आहे, त्याअर्थी ते रूप तसेच मोहक असले पाहिजे!’ मग काय! राजा तिची अफाट स्तुती करू लागतो!