शाकुन्तलच्या पहिल्या अंकातील पहिल्या प्रवेशात एका हरणाच्या मागे लागलेला, हातात धनुष्यबाण घेतलेला आणि आपल्या सारथ्यासह असलेला राजा रथात बसून प्रवेश करतो. एक अतिशय चपळ असे हरिण त्यांना हुलकावणी देत दूर पळत आहे. राजा त्याचा पाठलाग करण्यासाठी सारथ्याला आग्रह करत असतो. पण ते हरिण इतके दूर जाते की, त्यांना दिसेनासे होते. राजा आपल्या सारथ्याला असे का झाले असे विचारतो, तेव्हा इथली जमीन चढउताराची आणि खाबडखुबड असल्याने घोडय़ांना लगाम लावल्याने हरिण दूर पळून गेले, असे तो सांगतो. सपाटीवर गेल्यावर त्याला नक्कीच पकडण्याचा आपण प्रयत्न करू असे ते ठरवतात. राजा सारथ्याला पुन्हा लगाम सैल सोडण्यास सांगतो. तेव्हा घोडे अगदी वेगात पळताहेत असे राजा सूचित करतो. त्याला लांबवर पुन्हा हरिण दिसल्यावर तो त्याच्यावर नेम धरतो आणि मारू पाहतो. तेव्हा पडद्याआडून शब्द ऐकू येतात…‘राजा, ह्याला मारू नको. हा आश्रममृग आहे. समोरूनच आश्रमातील ‘वैखानस’ नावाचा तपस्वी हात वर करून ‘हरणाला मारू नको’ असे ओरडून सांगत असतो. राजा हात आवरता घेतो. वैखानस सांगतो की, ‘आम्ही आश्रमासाठी होमका÷s आणायला चाललो आहोत. हा मालिनी नदीकाठचा कण्व मुनींचा आश्रम आहे. तेव्हा बाकी काही कार्य नसेल, तर तू आश्रमात जाऊन तेथील पाहुणचार घ्यावा.’ राजा विचारतो की, ‘तुमचे कुलपती तिथे आहेत का?’ तेव्हा वैखानस माहिती देतो की, ते आपली कन्या शकुंतलेकडे पाहुण्यांच्या आतिथ्याची व्यवस्था सोपवून ते तिच्या अनिष्ट ग्रहांच्या शमनार्थ सोमतीर्थाला गेले आहेत. तेव्हा राजा आपण शकुंतलेला भेटून तिच्याकडेच कण्वमुनींबद्दलचा आपला भक्तीभाव निवेदन करू असे सांगतो. राजा सारथ्याला थांबण्याची आज्ञा करून स्वतःही रथातून खाली उतरतो आणि आजूबाजूला नजर टाकतो. तिथला रम्य परिसर पाहून तो प्रसन्न होतो. ‘हा आश्रमाचाच परिसर आहे, हे खरे आहे’ असे सारथ्याला सांगतो. वैखानस आपल्या शिष्यांसह आपल्या कामाला पुढे जातो. हरणाची पाडसे तिथल्या हिरवळीवर आनंदाने बागडत होती. आजुबाजूचा प्रदेश विविध वृक्षवल्लीनी रम्य दिसत होता. चित्तवृत्ती फुलवणारा होता. हे सारे पाहून राजा सारथ्याला आश्रमापासून दूरवरच आपला रथ थांबवण्याचा आदेश देतो, जेणेकरून आपल्या येण्याचा उपसर्ग तिथल्या माणसांना आणि पशुपक्षांना पोहचू नये. तपोवनात आपण नम्रपणानेच प्रवेश केला पाहिजे असे त्याला वाटते. म्हणून आपले धनुष्यबाण आणि आपले अलंकार सारथ्याकडे देतो. स्वतः आश्रमाकडे जायला निघतो आणि आपण परत येईपर्यंत घोडय़ांना पाणी पाजून त्यांच्या अंगावरही पाणी मारून ठेवायला सांगतो.
Previous Articleहिजाब प्रकरण मुख्य न्यायाधीशांकडे
Next Article मोदींचे घणाघात
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








