एकंदरीतच दुर्वासमुनींनी दिलेला शाप शकुंतलेच्या बाबतीत खरा होताना दिसत होता. त्यांच्या उःशापाप्रमाणे तिच्याकडे राजाची असलेली एखादी खूण त्याला दाखवल्यास तो तिला ओळखेल, हे शकुंतलेच्या सख्यांना माहित असल्याने गौतमीला त्यांनी ती आठवण करून द्यायला सांगितलेले असते. त्याप्रमाणे राजाला तिचे झालेले विस्मरण पाहून गौतमी अंगठी दाखवायला सांगते. पण ती कुठल्या तरी तीर्थाच्या ठिकाणी हातातून गळून पडलेली असते.त्यामुळे शकुंतलेच्या बोटात ती नसते. म्हणूनच राजाला पूर्वस्मृती प्राप्त होत नाही. त्यामुळे शकुंतलेची परिस्थिती ‘अत्र ना परत्र’ अशी होते. राजा तिला ओळखायला नकार देतो. तेव्हा त्याची निर्भत्सना करून सर्वजण निघून जातात. पण राजा शकुंतलेचा विचार करीत राहतो. तेवढय़ात पडद्याआडून ’आश्चर्य, आश्चर्य’ असे शब्द ऐकू येतात. राजाला काय झाले असावे कळत नाही. पण तोच पुरोहित आश्चर्याच्या स्वरात काही तरी अपूर्व घडल्याचे सांगत येतो. राजा प्रश्नार्थक दृष्टीने त्याच्याकडे पाहतो.तेव्हा पुरोहित खुलासा करतो.
कण्वशिष्य परत गेल्यावर शकुंतला असहायपणे रडू लागते. दैवाला दोष देते. आपले दोन्ही बाहू उंचावून ती शोक करू लागते. तेव्हा कुणी एक स्त्रीरूपी तेजस्वी ज्योत तिथे अवतरते आणि शकुंतलेला हात पुढे करून उंचावर उचलून घेते आणि अप्सरातीर्थावर निघून जाते असे पुरोहित सांगतो. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात. राजा म्हणतो, ज्या वस्तूचा आम्ही आधीच त्याग केला आहे, त्याबद्दल उगीच तर्क करण्यात काय फायदा? राजा पुरोहित आणि बाकी सर्वांना विश्रांती घ्यायला सांगतो आणि स्वतःही शयनगारात जाण्यासाठी निघतो.राजाच्या मनात शकुंतलेच्या बाबतीत त्याच्याकडून जे घडले त्याचे शल्य लागून राहते. त्याच्या मनात विचार येतो की, त्या परित्यक्ता मुनीकन्येला मी माझी कधी पत्नी केल्याचे मला स्मरत नाही. तरीही तिच्या अंतरीची तळमळ पाहून मला असे वाटू लागले आहे की, मी तिला कधीतरी वरले आहे…..अशा विचारातच तो शयनगृहात पोचतो. आणि पाचवा अंक इथेच संपतो.
सहाव्या अंकाच्या सुरूवातीला राज्यशालक कोतवाल आणि त्याच्या मागोमाग मुसक्मया आवळलेला एक इसम घेऊन दोन शिपाई मंचावर प्रवेश करतात. शिपाई त्या इसमाला चोप देऊन कोंदणावर नाव कोरलेली राजमुद्रिका त्याने कुठून चोरली ते विचारत असतात. चोर भेदरलेला असतो. तो सांगतो, ‘अहो दादा,मला मारू नका, मी चोऱया करणारा नाहिये. तर शुक्रघाटावर राहणारा एक कोळी आहे’ असे गयावया करून सांगतो.








