प्रतिनिधी/लातूर
केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल औरंगाबाद येथे येत्या दोन महिन्यात राज्याचे आघाडी सरकार कोसळणार असे विधान केले होते. या विधानाला अनुसरून काल लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, या तीन आघाडीच्या सरकारमध्ये कोणाचा कोणाला पायपोस नाही. या सरकारला काँग्रेसच विरोध करत असून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तर काँग्रेसने स्पष्टपणे विरोध केला आहे. यावरून हे सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून स्वतःच पडणार आहे असे मत व्यक्त केले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्यातील सर्वच पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी होणार आहेत. गेल्या एक वर्षाची सध्याच्या सरकारची कामगिरी व गेल्या पाच वर्षातील भाजपाच्या नेतृत्वाखाली असलेली सरकारची कामगिरी याची तुलना केली असता या सर्व आघाडीवर सरकारला अपयश आले असून यातून सर्वसामान्य शेतकरी, बेरोजगार युवक व शिक्षकांमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजी आहे. हिच नाराजी या मतदान यंत्रद्वारे व्यक्त होणार असून गेल्या कांही दिवसापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतिनुकसान झाले आहे. शेतकर्यांना तातडीने दहा हजार कोटी रूपयांची मदत जाहीर केली. परंतू त्यातील 5 हजार कोटी रूपये हे रस्त्याच्या कामाला दिले आहेत. शेतकर्यांना कवडीचीही मदत होवू शकत नाही.
शेतकर्यांना सरसकट 50 हजार रूपये मदत केली पाहिजे. याच सरकारमधील एक मंत्री वीज माफीची घोषणा करतो व प्रत्यक्षात अंमलबजावणीची वेळ आली असता अभ्यास न करता घोषणा केली होती असे सांगून शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम चालू आहे. मराठवाड्यातील शिक्षकांना अनुदान नाही. कोणतेही विकासाचे काम झाले नाही. परंतू देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलक्रांती तसेच मराठवाड्यातील वॉटरग्रीड जलसंधारणा योजना अशा अत्यंत उपयुक्त योजना आघाडी सरकारने बंद केल्या आहेत. हे सरकार म्हणजे बंदी सरकार असून या सरकारवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास राहिला नाही. मराठवाड्यासह भाजपाच्या सर्वच नेत्यांमध्ये उमेदवार बोराळकर यांना विजयी करण्याची स्पर्धा लागली असून प्रत्येक जिल्हा आघाडी देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
या पत्रकार परिषदेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे प्रमुख माजी आ.संभाजी पाटील निलंगेकर, खा.सुधाकर श्रृंगारे, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे आदिसह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.









