सातारा / प्रतिनिधी :
सातारा जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, बदली झालेले अधिकारी सोमवारी पदभार स्वीकारतील. तसेच लिपिक व अव्वल कारकुन यांच्याही दोन दिवसात म्हणजेच मंगळवारी बदल्या होण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्ह्यातील महसुल विभागातील अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी झालेल्या बदल्यांमध्ये वाईच्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनला तर त्यांच्या जागी भोरचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांची नियुक्ती झाली. माणच्या तहसीदार बाई माने यांची आटपाडी येथे बदली झाली आहे. तर जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांना मुदतवाढ मिळाली आहे. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाने गेल्या वर्षी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत. राज्य शासनाने यावर्षी 25 टक्के या सुत्रानुसार अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणस्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील महसूल विभागातील लिपीक, अव्वल कारकुन यांच्या बदल्या होणार आहेत.









