प्रतिनिधी / बेंगळूर
सिरा आणि राजराजेश्वरीनगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत निजदचा मोठा पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी मस्की आणि बसवकल्याण मतदारसंघातील पोटनिवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय निजद वरिष्ठांनी घेतला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
मस्की आणि बसवकल्याण पोटनिवडणुकीत निजदचे कोणतेच नेते निवडणूक लढविणार नाहीत. पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यामुळे कोणालाच पक्षातर्फे तिकीट दिले जाणार नाही. काही दिवसांपूर्वी सिरा आणि राजराजेश्वरी मतदारसंघात निजदला पराभवाला सोमारे जावे लागले आहे. तर राजराजेश्वरीनगर येथील निजद उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली आहे. सिरा मतदारसंघ निजदचा बालेकिल्ला असूनदेखील त्याठिकाणी निजद उमेदवाराचा पराभव झाला आहे. या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे आगामी पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय निजदने घेतला आहे, असे कुमारस्वामी यांनी सांगितले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत बसवकल्याण मतदारसंघातून निजदतर्फे माजी मंत्री पी. जी. आर. सिंद्या यांनी निवडणूक लढवून 40 हजारांवर मते मिळविली होती. याचबरोबर मस्की येथेही निजदने आपला उमेदवार रिंगणात उतरविला होता. मात्र, आगामी पोटनिवडणुकीपासून निजद दूर राहिल्याने चर्चेला ऊत आला आहे.









