भाजपकडून उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याआधीच प्रतापगौडा पाटील यांचा अर्ज
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील दोन विधानसभा आणि एका लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारीच अधिसूचना जारी झाली असून 30 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दरम्यान, रायचूर जिल्हय़ातील मस्की विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आर. बसवनगौडा तुर्विहाळ यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर पक्षातर्फे अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रतापगौडा पाटील यांनी सांकेतिकपणे अर्ज दाखल केला आहे.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतापगौडा पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. निजद-काँग्रेस युतीचे सरकार असताना त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मस्की विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून प्रतापगौडा यांना तिकीट मिळण्याचे निश्चित आहे. याच दरम्यान, भाजपमधील नेते बसवनगौडा तुर्विहाळ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना या पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघांनीही बुधवारी लिंगसगुरचे साहाय्यक आयुक्त तथा निवडणूक अधिकारी राजशेखर डंबळ यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोघेही मागील विधानसभा निवडणुकीवेळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते.
2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मस्की मतदारसंघात प्रतापगौडा पाटील (काँग्रेस) यांना 60,387 मते पडली होती. तर बसवनगौडा तुर्विहाळ (भाजप) यांना 60,174 मते मिळाली होती. निजद उमेदवार राजा सोमनाथ नायक यांना 11,392 मते पडली होती.









