70 वर्ष जुनी भारतीय कंपनी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तंबाखु, सिगारेट, हॉटेल आणि एमएफसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसीने मसाला कंपनी सनराइज फूड्स प्रायव्हेट लिमिटेडची खरेदी केली आहे. आयटीसीने सनराईज फूड्सचे सर्व समभाग 2,150 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. हा व्यवहार नुकताच पूर्ण केला असल्याचे आयटीसीने सांगितले.
आयटीसीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने 27 जुलै 2020 रोजी सनराईजच्या इक्विटी समभागाच्या भांडवलाचा हिस्सा 100 टक्के प्राप्त केला आहे. यासोबत सनराईज आणि त्यांच्या दोन सहकारी कंपन्या सनराईज शीतगृह प्रायव्हेट आणि हॉबिट्स इन्शुरन्स फूड्स या आयटीसी ताब्यात घेणार आहे. या अगोदर यांची 24 मे रोजी अधिग्रहणाची घोषणा केली होती. कोलकाता, आग्रा, जयपूर आणि बीकानेर या ठिकाणी कंपनीचे कारखाने आहेत. वित्त वर्ष 2019-20 या कालावधीत सनराईजची उलाढाल 591.50 कोटी रुपयांच्या घरात राहिली असल्याची माहिती आहे. सनराइज पूर्वीपासून भारतामध्ये मसाल्यांच्या क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी आहे. सनराईज 70 वर्ष जुना ब्रँड आहे. आयटीसीच्या माहितीनुसार या कंपनीच्या आशिर्वाद मसाल्यांनी तेलंगणा आणि आंध्रमध्ये मोठे वर्चस्व निर्माण केले होते. उत्तम प्रतिचा मसाला निर्मितीसोबत निर्यातीमध्येही या कंपनीचा दबाव राहिलेला आहे.









