एकमेव खांबाचे ’ज्ञानस्तंभ’ असे सार्थ नामकरण
जय नाईक/ पणजी
राजधानीच्या सौंदर्यात आणखी एक मानाचा तुरा ठरेल अशा अत्यंत मनभावक पद्धतीने बांधण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या केबल स्टेड पदपुलाचे उद्घाटन येत्या दि. 30 रोजी करण्यात येणार आहे. मळा खाडीच्या एका किनाऱयावर असंख्य ‘शैक्षणिक संस्था’ तर दुसऱया किनाऱयावर लाखो ‘पुस्तकांचे भांडार’ असलेले कृष्णदास शामा वाचनालय (अर्थात सरस्वतीची दोन रुपे) यांच्यातील दुवा ठरणाऱया या पदपुलाच्या एकमेव खांबाला म्हणूनच ‘ज्ञानस्तंभ’ असे सार्थ नाव देण्यात आले आहे.
सुमारे 7.68 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा पूल. या खाडीवर आतापर्यंत बांधण्यात आलेला चौथा पूल ठरला आहे. आजपर्यंत मळा भागातील लोकांना कोर्तीन येथील पदपुलावरून मोठा वळसा घालून बसस्थानक गाठावे लागत होते. या पुलामुळे खास करून विद्यार्थीवर्गासाठी पणजी बसस्थानक हाकेच्या अंतरावर म्हणावे एवढे जवळचे ठरणार आहे.
मळा खाडीवर आधीच तीन पूल असले तरी या चौथ्या पुलाचे बांधकाम सर्वांथाने वैशिष्टय़पूर्ण आणि मनभावक ठरले आहे. पलीकडील ईडीसी पाटो (अर्थात नवी पणजी) भागाच्या सौंदर्यात त्यामुळे अधिक भर पडणार आहे. आतापर्यंत मोठय़ा नद्यांवर केबल स्टेड तंत्रज्ञानाने पूल बांधण्यात येत होते. असे अनेक पूल राज्यात आहेत. याच पद्धतीने पदपूल बांधण्याचे राज्यातील हे पहिलेच उदाहरण असून त्याचे श्रेय मळा भागाला लाभले आहे.
केवळ एक खांब, त्यावर पूल 99 मीटर लांब !
सुमारे 99 मीटर लांब असलेल्या या पुलाचा 50 मीटर भाग खाडीवर तर उर्वरित 49 मीटर भाग जमिनीवर आहे. हा संपूर्ण भाग केवळ एका खांबावर झुलता ठेवण्यात आला असून त्याला दोन्ही बाजूनी ‘मॅकालॉय स्टेनलेस स्टील स्ट्रे रॉड’ केबलचा आधार देण्यात आला आहे. हा खांब पाटो भागातील कला संस्कृती भवन (कृष्णदास शामा वाचनालय) इमारतीच्यामागे जमिनीवर उभारण्यात आला आहे.
खांबाला नाव ‘ज्ञानस्तंभ’
खाडीतील पाणी वहनात अडथळा येऊ नये यासाठी पाण्यात कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. पुलाचा खांब वगळता अर्धेअधिक बांधकाम स्टेनलेस स्टील साहित्य वापरून करण्यात आले आहे. एखादा उंच मनोरा शोभावा असा गोल खांब हे या पुलाचे वैशिष्ठय़ ठरले आहे. सदर खांबाचा वरचा भाग राष्ट्रध्वजाच्या रंगांनी रंगविण्यात आला त्याखालील उर्वरित भागावर ’ओम सर्वे भवन्तू सुखिनः, सर्वे सन्तु निरामय…’ ही समस्त मानव कल्याणाची प्रार्थना आणि ’ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्य…’ ही गायत्री मंत्राची अक्षरे रंगविण्यात आली आहेत. या खांबाला ‘ज्ञानस्तंभ’ असे नाव देण्यात आले आहे. मांडवीवरील ’अटल सेतू’ च्या धर्तीवरच हा ’ज्ञान सेतू’ ही नेत्रदीपक रोषणाईने झळकविण्यात येणार आहे.
पुलाची आणखी एक वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे कला संस्कृती भवन इमारतीला बांधकामावेळीच विशेष व्यक्तींच्या सोयीसाठी पूल पद्धतीच्या रॅम्पची तजवीज करण्यात आली होती. त्याच रॅम्पला केबल स्टेड पदपुलाची जोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे सदर पूल आता त्या इमारतीचाच भाग बनल्यागत वाटत आहे.

मळा खाडीचा पाटो भागातील काठ खारफुटीने समृद्ध आहे. त्यामुळे पदपूल बांधताना या खारफुटीला कोणताही धोका पोहचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. याच खाडीच्या किनाऱयावर कला संस्कृती भनवची मनोवेधक इमारत दिमाखात उभी आहे. तिच्या शेजारी वस्तुसंग्रहालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. या दोन्ही इमारतींच्या मागील भागात असलेल्या घनदाट खारफुटीमधून आगळावेगळा असा ‘लाकडी वॉकवे’ बांधण्यात आला आहे. विशिष्ट पद्धतीच्या लाकडी खांबांवर बांधण्यात आलेला हा ‘वॉकवे’ पर्यटक आणि पर्यावरणप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
आता या सर्वांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी केबल स्टेड पदपूल आकारास येत आहे. रंगरंगोटी आदी कामे पूर्ण होऊन अंतिम हात फिरविल्यानंतर पुढील 15 दिवसात तो उद्घाटनासाठी सज्ज होणार आहे. गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे या पुलाचे बांधकाम करण्यात आले असून दि. 30 रोजी त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.









