गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांना यश
प्रतिनिधी / नवारस्ता
सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्राचे नवीन पोलीस स्टेशन करण्याच्या गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला राज्याच्या गृह विभागाने अखेर मान्यता दिली आहे. दरम्यान मल्हारपेठ पोलीस ठाण्यास मान्यता दिल्यासंदर्भात राज्य शासनाने आज बुधवारी आदेश जारी केले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
मल्हारपेठला नवीन पोलीस स्टेशन करणेकरीता सन 2001 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सन 2007 मध्ये या प्रस्तावासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न दाखल केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनी सदर प्रस्ताव हा तपासणीकामी पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रस्तावावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिला.
दरम्यान एक महिन्यापूर्वीच मुंबई मंत्रालय येथे झालेल्या राज्याच्या गृहविभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत मंत्री देसाई यांनी, एक महिन्याच्या आत मल्हारपेठ (ता. पाटण) येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन करणेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करा व हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा, अशा सूचना या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार मंत्री देसाई यांच्या या मागणीची गंभीर्याने आणि तात्काळ दखल घेऊन पोलीस अधीक्षक सातारा यांच्या आस्थापनेवरील पाटण पोलीस ठाणे व उंब्रज पोलीस ठाण्याचे विभाजन करून मल्हारपेठ दूरक्षेत्र आणि चाफळ दूरक्षेत्र यांचे उन्नतीकरण करून नवीन मल्हारपेठ पोलीस ठाणे निर्माण करण्यास तसेच त्याअनुषंगाने मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.









