प्रतिनिधी/ नवारस्ता
कोविड रक्त चाचणी करण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील लॅब मालक आणि डॉक्टर या दोघांनी संगनमताने बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीची कोविड रक्त चाचण्या करून रुग्णांना लुबाडल्याची तक्रार मल्हारपेठ पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. त्यानंतर मल्हारपेठ पोलिसांनी संबंधित लॅब मालक आणि डॉक्टर यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला असून लॅब मालकाला अटक करण्यात आली आहे. डॉक्टर अद्याप फरार असल्याची माहिती मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली.
पाटण तालुक्यातील नवसरी येथील दत्तात्रय राजाराम उदुगडे यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात एक तक्रार दिली होती. थकवा व कणकणी जाणवल्याने ते मल्हारपेठ येथील डॉ. वनारसे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. तेथे डॉ. वनारसे यांनी सलाईन लावले. सलाईन संपल्यानंतर रक्ताची चाचणी व कोविड चाचणी करायची आहे, असे सांगितले. चाचणी अहवाल आल्यानंतर डॉक्टरांनी चाचणी फी म्हणून 7 हजार 500 रुपये जमा करण्यास सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने जंबो कोविड सेंटर सातारा येथे उपचारासाठी पाठविले. उपचारानंतर घरी पाठविण्यात आले. दरम्यान, नातेवाईकांना या आजाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ओळखीच्या पुणे येथील डॉक्टरांकडे याबाबत चौकशी केली.
त्या चाचणी अहवालामधील कोविड ऍन्टीबॉर्डज व कोविड प्रोफाईल या चाचण्या आरटीपीसीआर करण्यापूर्वी कशा केल्या, असे सांगितले. नातेवाईकांनी याबाबत डॉक्टर वनारसे यांना समक्ष व यशवंत लॅबोरोटरीज्चे मालक अनिल इनामदार यांना फोनवर विचारणा केली. इनामदार यांनी फोनवरुनच तुमचा काय संबंध? व तुम्हालाच खोटय़ा गुन्हात अडकवण्याची धमकी दिली.
दरम्यान, संबंधित हॉस्पिटलचे डॉ. वनारसे व यशवंत लॅबोरोटरीज् मालक अनिल इनामदार यांनी माझ्या संमतीविना रक्त चाचणी केली. रक्त चाचणी करण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी दोघांनी घेतली नाही. सदरच्या चाचण्या करण्याचा यशवंत लॅबोरेटरीजला परवाना नाही. तरीही रक्त चाचणी करुन कोविड ऍन्टीबॉर्ड चाचणी निगेटिव्ह असताना कोरोना पॉझिटिव्ह सांगितले. यामुळे त्यांच्या कुटुंबियात मृत्यृची भीती निर्माण झाली, मानसिक त्रास झाला. त्यामुळे त्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात ‘तरुण भारत’ने पाटण तालुक्यात बेकायदेशीर कोरोना रक्त चाचणी लॅब?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
यासंदर्भात मल्हारपेठ पोलिसांनी कसून चौकशी केली असता संबंधित लॅब मालक इनामदार हे बेकायदेशीर लॅब चालवीत असून तक्रारदारांचीही फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार लॅब धारक आणि संबंधित डॉक्टर विरोधात मल्हारपेठ पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेतील संशयित आरोपी आणि लॅब मालक इनामदार याला अटक करून सोमवारी पाटण न्यायालयासमोर उभे केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा संशयित आरोपी डॉक्टर वनारसे हे फरार असून लवकरच त्यांना ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी दिली. दरम्यान, लॅबमधील बेकायदेशीर साहित्य पोलिसांनी जप्त केले असून लॅब सील केली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
बेकायदेशीर चाचणीमागे रॅकेट?
बेकायदेशीर कोविड चाचणी घेतल्या प्रकरणी मल्हारपेठ येथील लॅब धारकाला पोलिसांनी अटक केली असली तरी या चाचण्या केव्हापासून सुरू आहेत? त्यासाठी लागणारे वैद्यकीय किट कोठून आले? त्यातून किती लाखांची माया मिळवली? आणि संबंधित प्रकारचा गुन्हा करणारे आणखी कोण कोण आहे? तसेच त्यांना बेकायदेशीर चाचणीसाठी साहित्य, किट पुरवणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यामागे पांढरपेशी गुन्हेगारी असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या मागच्या रॅकेटचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे.









