नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासंबंधीच्या एका याचिकेवरील सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. यावेळी ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या प्रत्यार्पण सुनावणीसंबंधी आपल्याला अधिक माहिती नसल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आले. ब्रिटनच्या न्यायालयात ‘गुपचुप’पणे (सिक्रेट) विजय मल्ल्यासंबंधीची सुनावणी सुरू असल्याचे सॉलिसिटर जनरलनी न्यायालयात स्पष्ट केले. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत ब्रिटन सकारात्मक असले तरी अद्यापही न्यायालयीन सुनावणी सुरू असल्याने पुढील प्रक्रियेला गती आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. तसेच पुढील सुनावणीवेळी सविस्तर माहिती सादर करण्याची सूचना केंद्र सरकारला देण्यात आली आहे.









