गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतीचा दर्जा देण्याची मागणी
वार्ताहर/ हुबळी
कोळवाड ग्राम पंचायत व्याप्तितील मल्लिगवाड गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतीचा दर्जा देईपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा मल्लिगवाड ग्रामविकास आंदोलक समन्वय समितीने दिला आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना समितीचे संचालक महेश पत्तार यांनी, 2015 च्या ग्राम पंचायत निवडणुकीसह त्यानंतर घोषणा झालेल्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात आला आहे. गावाला स्वतंत्र ग्राम पंचायतीचा दर्जा न मिळल्याने आता होत असलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
कोळवाड ग्राम पंचायत स्वतंत्र करत उमचगी आणि मल्लिगवाड एकत्रित करून 2015 साली नवी ग्राम पंचायत स्थापण्यात आली. हुबळी तालुक्याला जवळ असल्याकारणाने उमचगीला ग्राम पंचायत केंद्राचा दर्जा देण्यात आला आहे. पण तसे पाहिल्यास मल्लिगवाड गाव हुबळीला जवळ आहे. अवैज्ञानिक निर्णयामुळे सुमारे तीन बसेसमधून 14 कि. मी. अंतराचा प्रवास करीत ग्राम पंचायत केंद्राला जाऊन आपले काम करून घ्यावे लागत आहे, असा आरोप मल्लिगवाड ग्रामस्थांनी केला आहे. मल्लिगवाडला ग्राम पंचायतीचा दर्जा द्यावा. अथवा कोळीवाड ग्राम पंचायतीमध्ये मल्लिगवाडचा समावेश करावा. गेल्या पाच वर्षापासून मंत्री, आमदारांसह अधिकाऱयांनी आपल्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहेत. त्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.