साई कल्याणकर यांची मागणी
वार्ताहर / बांदा:
सावंतवाडी की अन्य ठिकाणी या वादात सापडलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जागेचा वाद न वाढविता सध्याची परिस्थिती ओळखून बांदा येथील टोलनाक्याच्या जागेत सुरू करून या चर्चेला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सरपंच अक्रम खान यांना दिले आहे.
बांदा येथे होणाऱया आधुनिक टोलनाक्यासाठी शासनाने 32 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. सदर जमिनीत आजघडीला इमारती बांधून तयार आहेत. या इमारत बांधकामात शासनाचे पर्यायाने सामान्य जनतेचे कोटय़वधी रुपये अडकले आहेत. याचा आजघडीला सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शासनाने टोल नाक्यासाठी ताब्यात घेतलेल्या या जमिनीत केल्यास जिह्यातील जनतेबरोबरच या तालुक्यातील व वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यातील जनतेला लाभ होणार आहे, असे कल्याणकर यांनी म्हटले आहे.
बांदा हे ठिकाण राष्ट्रीय महामार्गालगत असल्यामुळे या भागात बऱयाचदा अपघात होतात. अशावेळी गंभीर रुग्णांना उपचारासाठी बांबोळी-गोवा येथे हलवावे लागते. माकड तापासारख्या साथीत जिल्हय़ाला गोवा-बांबोळी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागले होते. आज जगावर कोरोनाचे संकट आहे. जिह्यात सक्षम रुग्णालय नसल्यामुळे व असलेल्या रुग्णालयात अशा आजारांवर उपचार करणारी यंत्रणा व वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे सामान्य नागरिक धास्तावलेला आहे. अशावेळी आरोग्य कसे राखता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही कल्याणकर यांनी म्हटले आहे.
येथे वीज, पाणी, रस्ते उपलब्ध असून फक्त वैद्यकीय सेवा, साहित्य उपलब्ध केल्यास जनतेला चांगला लाभ होऊ शकतो, असे कल्याणकर यांनी म्हटले आहे.









