नव्या वर्षाची जोरदार सुरुवात करण्याची सिंधू, श्रीकांतकडून अपेक्
क्वालालंपूर / वृत्तसंस्था
आजपासून खेळवल्या जाणाऱया मलेशिया मास्टर्स सुपर 500 स्पर्धेत पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांतसह अन्य खेळाडू नव्या वर्षाची जोरदार सुरुवात करतील, अशी भारतीय बॅडमिंटन वर्तुळाची अपेक्षा आहे. जागतिक मानांकनात सहाव्या स्थानी असलेली सिंधू गतवर्षी बॅसेल, स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्याने चर्चेत राहिली. पण, नंतर उर्वरित हंगामात ती बहुतांशी स्पर्धांमध्ये लवकरच गारद झाली. डिसेंबरमध्ये वर्ल्ड टूर फायनल्समधील जेतेपदही तिला कायम राखता आले नाही.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला अवघ्या 7 महिन्यांचा कालावधी बाकी असताना सिंधू आपल्या खेळातील त्रुटी दूर करण्यासाठी आता प्रयत्नशील असेल, अशी अपेक्षा आहे. 4 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सिंधूला सोपा ड्रॉ मिळाला आहे. पहिल्या फेरीत रशियाच्या इव्हजेनिया कोसेत्स्कयाविरुद्ध तिची लढत होईल. नंतर उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या तई त्झू यिंगविरुद्ध तिचा सामना होण्याची शक्यता आहे.
सायना नेहवालकडूनही अपेक्षा
महिला एकेरीतील अन्य खेळाडूत सायना नेहवालच्या कामगिरीकडेही लक्ष असेल. गतवर्षी इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर तिची कामगिरी देखील बरीच खालावली होती. येथे ती पात्रताधारक खेळाडूविरुद्ध आपली मोहीम सुरु करेल. पुरुष एकेरीत ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित असल्याने पीबीएल स्पर्धेतून माघार घेणाऱया किदम्बी श्रीकांत येथे जोरदार सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे. चायनीज तैपेईच्या द्वितीय मानांकित चोऊ तिएन चेनविरुद्ध त्याची सलामी होईल.
जागतिक मानांकनात दुसऱया स्थानासह हंगामाची सांगता करणाऱया बी. साई प्रणितची पहिली लढत डेन्मार्कच्या रासमस गेम्केविरुद्ध होणार असून 2019 चा हंगाम कठीण ठरलेल्या समीर वर्मासमोर थायलंडच्या कॅन्टफोन वांगशारोएनचे आव्हान असेल. माजी सहावा मानांकित परुपल्ली कश्यप पहिल्याच फेरीत अव्वलमानांकित केन्टो मोमोटोविरुद्ध लढेल तर एचएस प्रणॉयची सलामी लढत जपानच्या कान्टा त्सुनेयामाविरुद्ध होणार आहे.
थायलंड ओपनमध्ये सुपर 500 चे जेतेपद मिळवणारी पहिली भारतीय जोडी ठरलेल्या सात्विकराज रणकिरणरेड्डी व चिराग शेट्टी यांच्यासमोर स्थानिक जोडी ओंग यू सिन व तिओ ई यि यांचे आव्हान असेल. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेणारी अश्विनी पोनप्पा दुखापतीतून सावरली असून येथे महिला दुहेरीत ती एन. सिक्की रेड्डीसह नशीब आजमावेल. या जोडीची लढत कोरियाच्या चँग ये ना व किम हे रिन यांच्याविरुद्ध होईल. मिश्र दुहेरीत मात्र अश्विनी व सिक्की या दोघींपुढेही कठीण आव्हान असणार आहे.
अश्विनी व सात्विक यांचा चीनच्या द्वितीय मानांकित वांग यि लियू व हुआंग डोंग पिंग यांच्याविरुद्ध तर सिक्की व प्रणव जेरी चोप्रा यांचा जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित झेंग सी वेई व हुआंग या क्विओंग यांच्याविरुद्ध बराच कस लागेल, असे चित्र आहे.
षा









