ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मलेशियात कोरोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आला आहे. हा विषाणू सर्वसामान्य कोरोना विषाणूंच्या 10 पट अधिक वेगाने संक्रमित होतो. ‘डी 614 जी’ असे या विषाणूचे नाव आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारतामधून मलेशियामध्ये परतलेल्या एका हॉटेल मालकाला या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या व्यक्तीने भारतातून परत आल्यावर मलेशियात 14 दिवस क्वारंटाईन होण्याचे नियम पाळले नव्हते. त्यामुळे इतरही काही लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.
क्वारंटाईनचे नियम मोडल्याने या व्यक्तीला 5 महिन्यांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मलेशियाच्या आरोग्य विभागाचे डायरेक्टर जनरल नूर हिशाम अब्दुल्ला म्हणाले, ‘डी 614 जी’ या नवीन कोरोना विषाणूचे घातक परिणाम होऊ शकतात. कोरोनावरील लस बनवण्यासाठी आतापर्यंत विकसित केलेली तंत्र देखील अपयशी ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यावी.
दरम्यान, कोरोनाचा हा नवीन प्रकार मनुष्याला अधिक गंभीर आजार पोहचवू शकतो, याबाबतचे पुरावे अद्याप उपलब्ध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.









